सरकारकडून यापूर्वीही कंडोनेशन डिलेचा वापर

फाईलवर कामत यांची टिपणी


22nd November 2017, 05:42 am

विशेष प्रतिनिधी | गोवन वार्ता
पणजी : कंडोनेशन डिलेच्या एका प्रकरणात सध्या दिगंबर कामत यांना पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाकडून लक्ष्य केले जात असले तरी कामत यांनी या संदर्भातील एका प्रकरणात अशा प्रकारचे निर्णय सरकारने यापूर्वीही घेतले आहेत, असे म्हणत फाईल मंजूर केली आहे. दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल हेदे यांच्या खाणींची फाईल खाण खात्यातून पुढे गेल्यावर एका महिन्यात मंजूर केली आहे.
सुमारे बेचाळीस खाणींना कंडोनेशन डिलेचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे कंडोनेशन डिलेचा प्रकार तसा नवा नाही. हेदे यांच्या कंडोनेशन डिलेच्या फाईलवर खाण खात्याचे तांत्रिक सहाय्यक श्याम सावंत यांनी टिपण लिहिले आहे. १३ ऑगस्ट २००७ रोजी त्यांनी हेदे यांच्या खाणीच्या लीजचे २० वर्षांसाठी नूतनीकरण करावे, असे त्यांनी म्हटले आहे.
उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे, सावंत यांनी आपल्या टिपणीमध्ये लोह खनिज हे ‘सी' श्रेणीत येते. त्यामुळे १९५७ च्या कायद्यानुसार अशा लीजच्या नूतनीकरणासाठी केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीची गरज नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे इतर लीजच्या प्रकरणांमध्ये (त्याची यादीही फाईलमध्ये दिली आहे) जसे पूर्वी सरकारने केले आहे तसेच हेदे यांच्या खाणीच्या बाबतीत करता येईल. १९८७ ते २००७ असे २० वर्षांसाठी नूतनीकरण करता येईल, असे म्हटले आहे. तसेच पर्यावरण दाखला घेण्याची अटही त्यात आहे. १३ ऑगस्ट २००७ च्या टिपणीसह ही फाईल पुढे गेली. १६ ऑगस्ट २००७ रोजी तत्कालीन खाण संचालकांनी ही टिपणी मान्य केली आणि ३ सप्टेंबर २००७ रोजी तत्कालीन खाण मंत्र्यांनी ती फाईल मंजूर केली.
खाण लीज कायद्यात जरी डिले कंडोनेशनची तरतूद नसली तरी, राज्यात विविध सरकारच्या काळात अशी प्रकरणे निकालात काढली आहेत. अन्य एका प्रकरणात कामत यांनी फाईलवर अशा प्रकारच्या अनेक प्रकरणांत यापूर्वी सरकारने अनुकूल निर्णय घेतले आहेत. त्यामुळे अर्जदाराने कंडोनेशन डिलेसाठी केलेली
विनंती मान्य केली आहे, असे म्हटले आहे. २५ एप्रिल २००६ रोजी ही फाईल मंजूर केली आहे. पोलिस जरी कामत यांच्या मागे लागले असले तरी, यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत.