बेकायदा रेती उत्खननावर कारवाई

सुमारे १ हजार क्युबिक मिटर रेती जप्त


22nd November 2017, 03:42 am

प्रतिनिधी | गोवन वार्ता
फोंडा : खाण आणि भूगर्भशास्त्र संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी आमोणा आणि माशेल परिसरात छापा मारून रेती भरलेल्या १६ होड्या आणि पाच ट्रक जप्त केले आहे. यामध्ये सुमारे १ हजार क्युबिक मिटर रेती जप्त केली
आहे.
ऑक्टोबर महिन्यात आमोणा परिसरात होत असलेल्या बेकायदा रेती उत्खनावर कारवाई केली होती. ३७ होडी, चार ट्रक, तसेच ५०० क्युबिक मीटर रेती जप्त केली होती. त्यानंतर काही दिवस येथील रेती व्यवसाय बंद झाला होता. मात्र पुन्हा सुरू झाल्यावर या संदर्भात संबंधित खात्याला तक्रार मिळाली. त्यानंतर खाण आणि भूगर्भशास्त्र खात्याने ही कारवाई केली.
गेल्यावेळी अधिकाऱ्यांनी या घटनेचा पंचनामा करून बेकायदा रेती व्यवसायात गुंतलेल्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. तरीही पुन्हा हा वेवसाय सुरू झाल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त होत आहे. यावेळी १६ होड्या रेतीने भरलेल्या आढळल्या, तर पाच ट्रक तिथे होते. ते जप्त करण्यात आले आहेत. नदीच्या काठावर मोठ्या प्रमाणात रेती काढून ठेवली होती. तीसुद्धा जप्त केली आहे, असे एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. बंदोबस्त ठेवण्यासाठी फोंडा व डिचोली पोलिसांना यावेळी पाचारण करण्यात आले होते. असे त्यांनी पुढे सांगितले. जप्त केलेली रेती लाखो रुपयांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.