योगीराज कामत आज एसआयटीसमोर

प्रकृती अस्वाथ्यामुळे दिगंबर कामत चौकशीसाठी गैरहजर


22nd November 2017, 07:36 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : बेकायदा खाण प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाने माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचे पुत्र योगीराज कामत यांना बुधवार, २२ रोजी सायंकाळी ४ वाजता रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागात चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. दिगंबर कामत यांनी प्रकृती अस्वाथ्यामुळे मंगळवारी ‘एसआयटी' समोर हजर राहण्याचे टाळले. त्यामुळे त्यांना शुक्रवारी बोलावण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या जामीन अर्जाला अंतरिम स्थगिती मिळाल्याने त्यांच्या अटकेची संधी हुकली. या पार्श्वभूमीवर कामत यांचे पुत्र योगीराज कामत यांना चौकशीसाठी बुधवारी पाचारण करण्यात आल्याने या प्रकरणातील उत्कंठा वाढली आहे. बेकायदा खाण प्रकरणी योगीराज कामत यांना नेमके कशासाठी बोलावले आहे, हे गुपितच आहे. परंतु, ते चौकशीसाठी हजर राहतील, अशी माहिती कामत यांच्या वकिलांनी दिली. योगीराज यांचा बेकायदा खाण प्रकरणाशी काही संबंध आहे का, ते एखाद्या लाभार्थी कंपनीचे संचालक आहेत का, असे सवाल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना केले असता, योगीराज कामत यांच्या एसआयटीसमोरील चौकशीनंतर ते स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
दिगंबर कामतांनी चौकशी टाळली
सोमवारी अटकपूर्व जामिनावर अंतरिम दिलासा प्राप्त झालेल्या आमदार दिगंबर कामत यांना मंगळवारी विशेष तपास पथकाने पुन्हा चौकशीसाठी पाचारण केले होते. दरम्यान, मंगळवारी प्रकृती अस्वाथ्यामुळे आपण हजर राहू शकत नाही, असे दिगंबर कामत यांनी कळवले. शुक्रवारी चौकशीसाठी आपण हजर राहू, असेही त्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.
यदुवंशींकडून सुगावा लागल्याची शक्यता
राजीव यदुवंशी हे तब्बल आठ वर्षे राज्य प्रशासनात होते. यापैकी कामत यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात खाण, वन आदी महत्त्वाची खाती यदुवंशी यांच्याकडे होती. राजीव यदुवंशी यांच्याशी योगीराज कामत यांचे चांगले संबंध होते. यदुवंशी यांच्याकडून बेकायदा खाण प्रकरणी काहीतरी सुगावा लागल्यानेच योगीराज कामत यांना चौकशीसाठी पाचारण केले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
यदुवंशी यांचा
जबाब निर्णायक
बेकायदा खाण प्रकरणी एसआयटीने गेल्या आठवड्यात माजी खाण सचिव तथा आयएएस अधिकारी राजीव यदुवंशी यांची चौकशी केली होती. त्यानंतर म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात फौजदारी दंड संहितेच्या कलम १६४ नुसार त्यांचा जबाब नोंदवला होता. यदुवंशींनी माफीचा साक्षीदार होण्याचे मान्य केल्यानंतर या तपासाला वेग आला. यदुवंशींनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपली दिशाभूल केल्याचे जबाबात म्हटल्याचे समजते. यदुवंशी यांचा जबाब अडचणीचा ठरू शकेल, हे आेळखून कामतांनी १८ रोजी विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.