अपयशातून नव्याने काम करण्याची ऊर्जा : सुभाष घई

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या ‘मास्टर क्लास’ सत्रात रसिकांशी संवाद


22nd November 2017, 12:32 am
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : यश प्रसिद्धी देत असते तर अपयश नव्याने काम करण्याची ऊर्जा देते. यशाबद्दल नेहमीच बोलले जाते. मात्र, यशप्राप्तीच्या मार्गात आलेल्या अपयशावर चर्चा होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रात तन-मन अर्पित करून काम करावे, असे मत प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सुभाष घई यांनी व्यक्त केले.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मॅकेनिझ पॅलेसमधील ‘मास्टर क्लास' या सत्रात घई यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. लहानपणी आईवडिलांचे संस्कार ओझे वाटते. परंतु, मोठे झाल्यावर तेच संस्कार उपयोगी पडतात. आईवडिलांकडून लाभलेले संस्कार लक्षात ठेवल्यास कधीही अपयश येणार नाही. व्यावसायिक यश आणि जीवनातील यश यांच्यात मेळ राखला पाहिजे, असे घई म्हणाले.
चित्रपट कारकिर्दीविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, जीवन खूप सुंदर आहे. त्याचा आनंद लुटताना लोकांनाही समजून घ्या. चित्रपट तयार करताना अनेक पूरक घटक उपलब्ध असतात. त्यासाठी स्वत: निर्मितीक्षम राहिले पाहिजे. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तीन वर्षे अभिनेता बनण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने पटकथेकडे वळलो. निर्मात्यांना पटकथा विकताना एक कथा अनेकांनी नाकारली. तीच कथा रमेश सिप्पी यांनी ऐकून चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीही सोपवली. त्यातून ‘कालीचरण' चित्रपटाची निर्मिती झाली.
सरकारच्या चित्रपट निर्मिती संस्थांमुळे अनेक नवोदित कलाकार तयार होत आहेत. यात ज्यांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी अभिनय स्कूल सुरू केले आहे. त्यात सध्या १००० विद्यार्थी प्रशिक्षण घेत असून जगातील अव्वल सहा अभिनय स्कूलमध्ये त्याचा क्रमांक लागतो, अशी माहिती घई यांनी दिली.
सादरीकरणात देश मागे
देशात हरतऱ्हेच्या कथांवर दिग्दर्शक काम करतात. मात्र, त्या कथा लोकांसमोर कशा मांडाव्यात याचे योग्य तंत्र अजूनही अवगत झालेले नाही. त्यामुळे देशात शेकडो चित्रपट तयार झाल्यानंतरही आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट कथानकाच्या सादरीकरणामध्ये मागे पडतो, असे दिग्दर्शक घई यांनी सांगितले.
जीवनात वाचन आवश्यक
अभिनेता होण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश न आल्याने पटकथा लेखनाकडे वळलो. लहानपणी केलेल्या वाचनाचा लाभ घेत अनेक पटकथा लिहिल्या. त्यामुळे जीवनात वाचन आवश्यक असल्याचे घई यांनी सांगितले. तसेच एकावर्षी सहा पटकथा विकल्याचेही नमूद केले. चित्रपट क्षेत्रात वावरताना एका विषयावर दुसरा चित्रपट बनवलेला नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी पुढे काय ? हा प्रश्न नवी प्रेरणा देतो व तेच मुख्य आव्हान असल्याचे घई म्हणाले.
कथानक हा चित्रपटाच्या यशाचा गाभा
चित्रपट निर्मितीसाठी दिग्दर्शकाकडे ३२ ललितकला असणे आवश्यक आहे. दिग्दर्शक हा चित्रपटाची आई असतो. त्याला प्रत्येकवेळी यश मिळणार नाही. १०० टक्के निकालाची अपेक्षा करणाऱ्या दिग्दर्शकाच्या हाती काहीच लागत नाही. सध्या माध्यमांचे स्वरुप बदलत असून कथानक हाच चित्रपटाच्या यशाचा गाभा ठरताे, असेही सुभाष घई यांनी सांगितले.
‘एस. दुर्गा' इफ्फीत दाखविण्याचे आदेश
केरळ उच्च न्यायालयाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) एस. दुर्गा हा चित्रपट दाखविण्याचे आदेश आयोजकांना दिले आहेत. दिग्दर्शक सनल कुमार शशीधरन यांच्या याचिकेवरील मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी केरळ उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. मल्याळम दिग्दर्शक सनल कुमार शशीधरन यांचा ‘एस दुर्गा' आणि रवी जाधव यांचा ‘न्यूड' या सिनेमांना कोणतीही पूर्वसुचना न देता इफ्फीतून वगळण्यात आले होते. परीक्षकांनी या दोन्ही सिनेमांना हिरवा कंदील देऊनही माहिती व प्रसारण मंत्रालयाने हे दोन्ही सिनेमा इफ्फीतून वगळले होते.