कलाकार, प्रतिभावंतांनी दबावाला बळी पडू नये : माजिद मजिदी

परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी आपल्या निर्मितीपासून तुम्ही मागे हटता कामा नये


22nd November 2017, 03:14 am
प्रभाकर ढगे
गोवन वार्ता
पणजी : चित्रपट कथा लेखक, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलाकार अशा सृजनशील निर्मितीच्या क्षेत्रात काम करीत असलेल्या कोणीही विरोधाला किंवा दबावाला बळी पडता कामा नये. कारण तसे झाले तर आपण आपल्या कलेला आणि प्रतिभेला न्याय देऊ शकणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन ‘बियाँड दी क्लाऊड' या इराणी चित्रपटाचे दिग्दर्शक माजिद मजिदी यांनी ‘गोवन वार्ता'शी बोलताना केले. ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माजिदी मजिदी यांचा भारतात चित्रित झालेला ‘बियाँड दी क्लाऊड' उद्घाटनाचा चित्रपट म्हणून सोमवारी कला अकादमीत प्रदर्शित झाला. त्यानिमित्त आपल्या टीमसह माजिद मजिद इफ्फीला उपस्थित आहेत.
सध्या भारतात संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध होत आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल?
माजिद मजिद : तुम्ही ज्यावेळी वेगळे काही करू पाहता, वेगळा विचार मांडू पाहता त्यावेळी विरोध हा ठरलेलाच असतो. मला वाटते ‘पद्मावती' चित्रपटाबाबतही तेच घडत असावे. कुठल्याही क्षेत्रातील प्रतिभावंतांची आणि कलाकारांची वेळोवेळी मुस्कटदाबी झाल्याची उदाहरणे सगळीकडेच आहेत. पण अशा विरोधाला न जुमानता आपले काम चालू ठेवले तरच आपण त्यास न्याय देऊ शकतो, हेही खरे आहे. त्यामुळे मी माझ्या भारतीय मित्रांना सांगेन की, त्यांनी अशा दबावापुढे झुकून तडजोडी करू नये.
मराठी चित्रपट ‘न्यूड' आणि मल्याळम चित्रपट ‘एस. दुर्गा' यांच्या बाबतीतही असेच घडले आहे. ज्युरींनी इफ्फीच्या प्रदर्शनासाठी निवडलेल्या या दोन्ही चित्रपटांना इफ्फीच्या सरकारी आयोजकांनी शेवटच्या क्षणी वगळले आहे. त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया असेल?
माजिद मजिद : असे घडायला नको होते. एकदा ज्युरींनी प्रदर्शनासाठी चित्रपट निवडल्यानंतर ते चित्रपट वगळणे योग्य नाही. सरकारने आणि इफ्फी आयोजकांनी त्यावर फेरविचार करायला हवा. तुम्ही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासारख्या ठिकाणीही लोकांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य देणार नसाल तर नवीन प्रयोग, नाविन्यपूर्ण कलाकृती, वेगळे विषय, वेगळी मांडणी, धाडसी विचार याला सामोरे कोण जाणार? अजोड कलाकृती तयार होण्यासाठी कलाकार आणि प्रतिभावंतांना स्वातंत्र्य मिळणे गरजेचे आहे. नाहीतर आपण आपल्या कला वैभवाला खाली खेचल्यासारखे होईल.
इराण हा देश मुस्लिम परंपरेचे कट्टरपणे पालन करणारा म्हणून ओळखला जातो. असे असताना आपण ‘मुहम्मद : दी मेसेंजर अॉफ गॉड' हा चित्रपट बनवला. आपणालाही धमक्या व विरोधाला सामोरे जावे लागले. या अनुभवाबद्दल सांगा.
माजिद मजिद : ‘मुहम्मद : दी मेसेंजर अॉफ गॉड' हा चित्रपट म्हणजे पाश्चात्त्य देशातील लोकांचा मुस्लिमांबद्दल आणि त्यांच्या धर्माबद्दल असलेला गैरमज दूर करण्यासाठी बनविला आहे. हा तीन भागांत विभागलेला सिनेमा आहे. मुस्लिम धर्माची सविस्तर ओळख, असेच त्याचे स्वरूप आहे. पण कट्टरपंथियांना तो रूचला नाही. मला अनेकवेळा धमक्या दिल्या गेल्या. सिनेमा मागे घेण्याविषयी दबाव आला; पण मी माझ्या विचारावर ठाम राहिलो. या चित्रपटाचे भारतीय संगीतकार ए. आर. रहमान यांनाही भारतात या विरोधाचा आणि धमक्यांचा सामना करावा लागला. तुमचे बौध्दिक कौशल्य, इच्छा व प्रतिभा पणाला लावून तुम्ही अशी कलाकृती बनवत असता. त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी आपल्या निर्मितीपासून तुम्ही मागे हटता कामा नये, असे मला वाटते. इराणमध्ये भारताच्या तुलनेत अधिक धार्मिक कडवेपणा आहे, कडक सेन्सॉरशीप आहे. तरीदेखील इराणी सिनेमा अनेक अंगांनी फुलताना दिसतो. त्यामागे हेच कारण आहे.
‘बियाँड दी क्लाऊड' हा चित्रपट भारतीय कलाकारांना सोबत घेऊन, भारतातील कथेवर आणि भारतातच चित्रित करावा, असे का वाटले?
माजिद मजिद : मी नेहमी असे मानत आलो आहे की, भारत ही प्रचंड वैविध्य असलेल्या कथांची भूमी आहे. ते विषय बॉलिवूडमध्ये आले नाहीत, असेही मला म्हणायचे नाही. बॉलिवूडची स्वत:ची एक वेगळी परंपरा आहेच; पण मला वाटले की, भारतीय कथा विषयांवर आपण आपल्या पद्धतीने काही तरी वेगळे काम केले पाहिजे. चित्रपटाचा विषय भारतातील असेल तर साहजिक येथील कलाकारच त्या भूमिकांना योग्य न्याय देऊ शकतील. चित्रपटातील वातावरण अस्सल दाखवायचे तर चित्रीकरण इथलेच हवे. या सगळ्या अंगाने विचार करून मी भारतात चित्रपट तयार केला. आणखी एक चित्रपट भारतातच तयार करणार असून, त्याचाही कथा विषय अर्थातच भारतातील आहे.