आई-वडिलांच्या वादात मुलांची स्थिती दर्शविणारा ‘पिहू’

‘इंडियन पॅनोरमा’ विभागाचे ‘पिहू’ या चित्रपटाने उद्घाटन


22nd November 2017, 03:13 am
आई-वडिलांच्या वादात मुलांची स्थिती दर्शविणारा ‘पिहू’अजय लाड
गोवन वार्ता
पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा' विभागाचे उद्घाटन पुष्कर पुराण व दिग्दर्शक विनोद कापरी यांच्या ‘पिहू' या चित्रपटाने करण्यात आले. या चित्रपटात गंभीर विषयाची मांडणी योग्य प्रकारे केल्याने चित्रपटातील प्रत्येक क्षण हृदयाचा ठोका चुकविणारा ठरला आहे.
दिग्दर्शक विनोद कापरी यांच्या ​‘पिहू' चित्रपटात केवळ दोनच व्यक्तिरेखा दाखविण्यात आल्या आहेत. दोन वर्षांची गोंडस पिहू (मायरा विश्वकर्मा) व पिहूची आई (प्रेरणा विश्वकर्मा) यांच्या अवतीभोवती फिरणारा हा चित्रपट आई-वडिलांच्या वादात मुलांची होणारी स्थिती दर्शवितो.
पिहूच्या बदलत्या मूडचे चित्रीकरण करतानाच प्रेक्षकांनाही कसे खिळवून ठेवता येईल, याचाही विचार केलेला आहे. चित्रपटाची सुरुवात पिहूच्या वाढदिवसाच्या रात्रीपासून होते. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर पिहू आईला झोपेतून उठविण्याचा भरपूर प्रयत्न करते. आई उठत नसल्याने ती आपली कामे स्वत:च करते. त्यावेळी पिहूचा बदलत जाणारा मूड उत्तमरीत्या चित्रीत करण्यात आला आहे.
काही वेळानंतर पिहूच्या आईच्या हातातून गोळ्यांची डबी खाली पडते. त्यावेळी पिहूच्या आईने आत्महत्या केल्याचे प्रेक्षकांना समजते. तोपर्यंत गोंडस पिहूच्या बाललीलांमध्ये प्रेक्षक पूर्णत: गुंतून गेलेला असतो.
आई बेडवर मृतावस्थेत असल्याचे न समजण्याचे पिहूचे वय. त्यातच वडील सकाळीच काही कामानिमित्त कोलकात्याला निघून गेलेले असतात. पिहूच्या आई-वडिलांचे भांडण झालेले असते. पिहूच्या वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय अाल्याने पिहूची आई आत्महत्या करते. त्यातच भर म्हणून पिहूचे वडील इस्री बंद करायचे विसरलेले असतात. स्वयंपाकघरातील नळ सुरू असतो. भुकेलेल्या पिहूने फ्रीज, ओव्हन व गॅस सुरू केलेला असतो. या गोष्टींपासून पिहूला धोका पोहोचण्याची शक्यता, गॅलरीतून खाली पडलेली बाहुली काढण्यासाठी पिहूची धडपड चाललेली असताना ती खाली पडेल का, याकडेच लक्ष लागून राहिलेले असते. वडिलांचा फोन आल्यानंतर पिहू त्यांना आई झोपल्याचे सांगते. त्यामुळे वडील पुन्हा माघारी निघतात.
या कालावधीत आईच्या हातातून पडलेल्या काही गोळ्या पिहू खाते व ती निपचित पडते. यावेळी प्रेक्षकांतून हळहळ व्यक्त होताना दिसते. काहीवेळात पिहूचे वडील दरवाजा तोडून प्रवेश करतात. घरात वीज गेलेली असते, विद्युत जोडणी जळालेली असते. पिहूला बेडखाली खेळताना पाहून सगळेच सुटकेचा निःश्वास सोडतात. आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या प्रियजनांचे काय होईल, याचाही विचार केला गेला पाहिजे, हाच संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे.