वास्कोत खास चित्रपटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, नाना बांदेकर यांची उपस्थिती


22nd November 2017, 03:12 am
प्रतिनिधी | गोवन वार्ता
वास्को : ४८ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त येथे के सेरा सेरा या चित्रपटगृहात आयोजित करण्यात आलेल्या खास चित्रपटांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन एनआरबी समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नारायण (नाना) बांदेकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. याप्रसंगी मराठी सिने कलाकार मृणाल कुलकर्णी, मुरगावचे नगराध्यक्ष दीपक नाईक, मुख्याधिकारी आग्नेल फर्नांडिस व मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटगृहामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांचे २३ दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. मंगळवारी दुपारी २.३० वाजता उद्घाटन झाल्यावर ‘येलो' हा चित्रपट दाखविण्यात आला. या प्रसंगी बांदेकर म्हणाले, की के सेरा सेरा चित्रपटगृहामध्ये दर्जेदार चित्रपट दाखविण्यात येणार असल्याने वास्कोतील रसिकांची सोय झाली आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या काळात चित्रपट पाहण्यासाठी पणजी येथे जाण्याची गरज नाही.