कोपर्डी बलात्काऱ्यांना फाशी नको

बचाव पक्षाचा युक्तिवाद


22nd November 2017, 04:49 am

अहमदनगर : कोपर्डी बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी दिली जाऊ नये. त्यांना कमीत कमी शिक्षा देण्यात यावी, अशी विनंती बचाव पक्षातर्फे मंगळवारी न्यायालयात करण्यात आली. ‘एका आरोपीचे लग्न झाले आहे. एकाचे शिक्षण सुरू आहे. त्यांच्या मागे म्हातारे आई-वडील आहेत,' असा युक्तिवाद यासाठी करण्यात आला.
महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार प्रकरणी जितेंद्र बाबूलाल शिंदे, नितीन भैलुमे व संतोष भवाळ या नराधमांना
विशेष सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांच्या शिक्षेवरील सुनावणीला मंगळवारी सुरुवात झाली.
पहिल्या दिवशी आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला. जितेंद्र शिंदे याच्या वतीने अॅड. योहान मकासरे यांनी युक्तिवाद केला. शिंदेचे लग्न झालेले असून त्याच्या पाठीमागे वृद्ध आई-वडील आहेत. त्यामुळे त्याला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असे म्हणणे अॅड. मकासरे यांनी मांडले. न्यायालयाने शिंदेकडेही शिक्षेबद्दल विचारणा केली. त्यावर, 'शिक्षा एक दिवसाची काय आणि हजार दिवसांची काय एकच आहे, असे तो म्हणाला.
आरोपी नितीन भैलुमे याच्या वतीने अॅड. प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद केला. भैलुमे हा बीएससीचे शिक्षण घेतोय. त्याचे आई-वडील हे वृद्ध आहेत. त्यामुळे त्याला कमीत कमी शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद आहेर यांनी केला. भैलूमे याने मी निर्दोष असल्याचे न्यायालयासमोर सांगितलं. तिसऱ्या आरोपीच्या शिक्षेबाबत उद्या युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर सरकारी पक्षाकडून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद करतील. ते नेमकी कोणत्या शिक्षेची मागणी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.