काणकोणात पाणी टंचाईची शक्यता

यंदा ८३ इंच पावसामुळे चापोली धरण जलाशयाची पातळी कमी


22nd November 2017, 03:43 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
काणकोण : यंदा काणकोण तालुक्यात फक्त ८३ इंच पावसाची नोंद झाली असल्याने चापोली धरण जलाशयाने यंदा पूर्ण क्षमतेची पातळी ओलांडलेली नाही. त्यामुळे उन्हाळ्यात या धरणाच्या जलाशयावर अवलंबून असलेल्या रहिवाशांना उन्हाळ्यात पाणी टंचाई भासणार अशी भीती आतापासूनच वाटू लागली आहे.
काणकोणात सध्या एकमेव चापोली धरण आहे. गावडोंगरी पंचायत क्षेत्रातील गावणे धरणाचे काम सध्या चालू आहे. आणखी दोन वर्षे तरी या धरणाचे पाणी मिळणे कठीण आहे. त्यामुळे चापोली धरणाच्या पाण्यावर नागरिकांना अवलंबून रहावे लागणार आहे. त्यातच जलसिंचनासाठी या धरणाचे पाणी कालव्यातून सोडण्यात येते.
मार्च ​एप्रिल महिन्यात चापोली धरण जलाशयाच्या पाण्याची पातळी घटते. त्यावेळी काणकोणात वर्षभर पाऊस पडला नसला तरी संपूर्ण तालुक्यास पाणी पुरवठा करण्याची क्षमता जलशयातील पाण्यात असल्याचे प्रत्येकवेळी काणकोण जलस्रोत खात्याचे अधिकारी सांगतात.
चापोली धरण जलाशयाची पाण्याची क्षमता ३८.७५ आर. एल. आहे. मात्र यंदा पाऊस कमी झाल्यामुळे जलाशयात ३८.५० आर. एल. पाण्याचा साठा झाला. यंदा काणकोणात दरवर्षापेक्षा १५ इंचांनी पाऊस कमी झाला आहे. यंदा गुळे, देवबाग येथील शेतकऱ्यांनी शेतीसाठी नियमित पाणी सोडण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे कालव्याच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. त्यानुसार जलस्रोत खात्याने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
गेल्यावर्षी काणकोणात २५ जुलैपर्यंत ८१ इंच पाऊस पडला होता, तर यंदा २५ जुलैपर्यंत ६६ इंच पाऊस झाला. २०१५ मध्ये तो ५८ इंच पाऊस झाला होता. त्याचप्रमाणे गेल्यावर्षी आतापर्यंत चापोली धरण जलाशयात ३७.२८ आर. एल. पाण्याचा साठा तयार झाला होता. यंदा तो फक्त ३४.५१ आर. एल. आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला होता.
पाणी पुरवठा खाते विषय कसा हाताळणार?
यंदा धरण जलाशय पूर्ण क्षमतेने भरला नसल्याचा धसका काणकोण पाणीपुरवठा विभागाने आतापासूनच घेतल्याचे सिद्ध झाले आहे. काणकोण नगरपालिका क्षेत्रात नळांना एक तास सुद्धा दिवसाला पाणीपुरवठा केला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. नोव्हेंबर महिन्यात ही स्थिती तर मार्च एप्रिल महिन्यात पाणी पुरवठा खाते पाण्याचा विषय कसा हाताळणार, असा प्रश्न काणकोणच्या माजी नगराध्यक्षा सुचना गावकर यांनी केला आहे.