पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्त

चावडी रुबी रेसिडन्सी प्रकरण


22nd November 2017, 03:39 am
पुरावे नसल्याने अधिकारी दोषमुक्तप्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : चावडी- काणकोण येथील रुबी रेसिडन्सी प्रकरणी सर्व आठ सरकारी अधिकाऱ्यांना गेल्या सोमवारी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने निर्दोष ठरविले. ती इमारत कोसळण्यास कारणीभूत असलेली त्यांची भूमिका तसेच भ्रष्टाचाराचा मुद्दा शाबूत करण्याएवढा पुरावा पोलिस पथक जमा करू न शकल्याने संशयाचा फायदा देऊन त्यांना निर्दोष ठरविण्यात आले.
न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्या निरीक्षणावरून पोलिस आवश्यक ते पुरावे न्यायालयात सादर करू शकले नाहीत, हे सिद्ध झाले. आपल्या ९२ पानी निकालपत्रात देशपांडे यांनी पुढील मुद्दे नोंद केले आहेत. अधिकाऱ्यांनी फाईली तातडीने हातावेगळ्या केल्या याचा अर्थ त्यांनी बिल्डर किंवा कंत्राटदाराशी संगनमत केले असा होत नाही. असे दाखवणारा किंवा संशय व्यक्त करणारा कोणताही पुरावा तक्रारदारांनी सादर केलेला नाही, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. प्रक्रियेतील गैरप्रकारांसह फाईल संमत करण्यात आली असावी, याचा अर्थ बिल्डरांनी सरकारी अधिकाऱ्यांशी फौजदारी स्वरुपाचे कारस्थान केले असे म्हणता येणार नाही. अशी कृती ही तांत्रिक किंवा प्रक्रियेतील चूक असल्यास त्यावर खात्यांतर्गत कारवाई होऊ शकते, तो फौजदारी गुन्हा मानता येणार नाही, असे निवाड्यात नमूद करण्यात आले आहे.
६ फेब्रुवारी २०१४ रोजी चौकशी आयोगाने सादर केलेल्या अंतरिम अहवालात प्रक्रियेतील व तांत्रिक त्रुटींवर बोट ठेवले आहे. बांधकामातील दोष हा बिल्डरांचा, अभियंत्याचा किंवा वास्तूविशारदांशी थेट संबंधित आहे, त्याचा सरकारी अधिकाऱ्यांशी संबंध नाही, असे निवाड्यात म्हटले आहे.
केवळ संशय आणि समज व्यक्त करण्यात आला असला तरी अधिकाऱ्यांनी पैशांची मागणी केली असे दाखविणारा कोणताही पुरावा फिर्यादी पक्षाने सादर केलेला नाही. या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेत त्या काळात वाढ झाल्याचेही फिर्यादी पक्ष दाखवू शकलेला नाही, असे न्या. देशपांडे यांनी म्हटले आहे.
खटल्याला सामोरे जाणार : विश्वास देसाई
रुबी रेसिडन्सी दुर्घटना प्रकरणी दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आपण आदर करीत असून त्यांनी सूचित केल्याप्रमाणे काणकोण प्रथम श्रेणी न्यायालयात आपण खटल्याला सामोरे जाणार असल्याचे चावडी- काणकोण येथील रुबी रेसिडन्सीचे ठेकेदार विश्वास देसाई यांनी मंगळवारी सांगितले.
४ जानेवारी २०१४ रोजी ३१ कामगारांचा बळी घेणाऱ्या रुबी प्रकरणातील देसाई हे एकमेव आरोपी ठरले आहेत. न्यायालयात मी माझे निर्दोषत्व सिद्ध करेन, असे त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले. रुबी दुर्घटना हा एक अपघात होता, हे बांधकाम क्षेत्रातील माझ्या २७ वर्षांच्या अनुभवावरून आपण सांगू शकतो असे त्यानी पत्रकारांच्या संबंधित प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सत्र न्यायालयाने काणकोण न्यायालयात जरी खटल्याला सामोरे जाण्यास सांगितले असले तरी सदोष मनुष्यवध, गुन्हेगारी कट, भ्रष्टाचार व नगर नियोजन कायदा भंग या आरोपातून आपली मुक्तता केल्याचे देसाई यांनी सांगितले.