लंकेच्या गोलंदाजांना भारताच्या फलंदाजांचे चोख प्रत्युत्तर

पहिल्या डावात श्रीलंका सर्वबाद २९४ धावा : धवन, राहुलची दुसऱ्या डावात शतकी भागीदारी


20th November 2017, 03:59 am
कोलकाता : सलामीवीर शिखर धवन (९४) आणि केएल राहुलच्या (नाबाद ७३) शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात श्रीलंकेवर ४९ धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात लंकेला २९४ धावांवर रोखल्यानंतर भारताने दुसऱ्या डावाला दमदार सुरुवात केली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा राहुल आणि चेतेश्वर पुजारा (नाबाद २) मैदानावर होते.
शनिवारच्या चार बाद १६५ धावसंख्येवरुन लंकेने आपला खेळ सुरू केला. पण भुवनेश्वर आणि शमीने सुरुवातीलाच लंकेला धक्के दिले. पण लंकेकडून शेवटच्या फळीत रंगना हेराथने केलेल्या ६७ धावांच्या जोरावर श्रीलंकेने २९४ धावांपर्यंत मजल मारली. रंगनाने भारतीय गोलंदाजी फोडून काढत अर्धशतकी खेळी केली. पाऊस आणि अंधुक सूर्यप्रकाश यामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या १ बाद १७१ धावा झाल्या होत्या. भारताकडे आता दुसऱ्या डावामध्ये ४९ धावांची आघाडी आहे.
ईडन गार्डनमधील चांगल्या स्थितीचा फायदा उठवत धवन आणि राहुलने १६६ धावांची भागीदारी केली. दोघांनी श्रीलंकेच्या पहिल्या डावातील १२२ धावांची आघाडी संपवत भारताने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत लंकेवर आघाडी घेतली होती.
चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने एक गडी गमावून १७१ धावा केल्या होत्या. चांगले ऊन पडल्यामुळे खेळपट्टी पूर्णपणे सुकल्यामुळे फलंदाजांना खेळणे सोपे झाले होते. राहुल व धवनने संयम राखून खेळताना खराब चेंडूंवर धावा केल्या. धवनने स्पिनरविरुद्ध बॅकफूटचा चांगला वापर केला. मात्र, धवन शतकापसून ६ धावा दूर राहिला. त्याला ९४ धावांवर दासुन चनाकाने बाद केले. धवनने ११६ चेंडूंचा सामना करताना आपल्या डावात १३ चौकार आणि दोन षटकार लगावले. राहुलने ११३ चेंडूंचा सामना करत आपल्या डावात ८ चौकार लगावले.
वेगवान गोलंदाज महम्मद शमी उजव्या पायाला दुखापत झाल्यानंतरही गोलंदाजी करताना सकाळच्या सत्रात तीन गडी बाद केले, मात्र तळातील लंकन फलंदाजांनी धैर्यपूर्ण फलंदाजी करताना लंकेला पहिल्या डावात २९४ धावांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले. भुवनेश्वर कुमारने ८८ धावा देत तर शमीने १०० धावा देत प्रत्येकी ४ गडी बाद केले. भारताने श्रीलंकेच्या इतर ६ फलंदाजांना बाद करण्यासाठी ३८ षटके टाकली. लंकेसाठी नवव्या क्रमांकाचा फलंदाज रंगना हेराथने ६७ धावा केल्या व या खेळीमुळे पाहुण्या संघाने यजमानांवर १२२ धावांची आघाडी
घेतली.
धावफलक
भारत : प. डाव : सर्वबाद १७२ धावा : दु. डाव : १ बाद १७२ धावा : लोकेश राहुल (नाबाद) ७३, शिखर धवन झे. डिकवेला गो. शनाका ९४, चेतेश्वर पुजारा (नाबाद) २. गोलंदाजी : सुरंगा लकमल ८-०-२९-०, लाहिरू गमागे ९-०-४७-०, दसुन शनाका ९.३-१-२९-१, दिलरुवान परेरा १०-१-४१-०, रंगना हेराथ ३-०-२५-०.
श्रीलंका : प. डाव : सर्वबाद २९४ धावा : सदिरा समरविक्रमा झे. साहा गो. भुवनेश्वर २३, दिमुथ करुणारत्ने पा. गो. भुवनेश्वर ८, लाहिरू थिरीमाने झे. कोहली गो. उमेश ५१, एंजिलो मॅथ्यूज झे. राहुल गो. उमेश ५२, दिनेश चंदीमल झे. साहा गो. शमी २८, निरोशन डिकवेला झे. कोहली गो. शमी ३५, दसुन शनाका पा. गो. भुवनेश्वर ०, दिलरुवा परेरा झे. साहा गो. शमी ५, रंगना हेराथ झे. शमी गो. भुवनेश्वर ६७, सुरंगा लकमल त्रि. गो. शमी १६, लाहिरू गमागे (नाबाद) ०. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार २७-५-८८-४, महम्मद शमी २६.३-५-१००-४, उमेश यादव २०-१-७९-२, रविचंद्रन अश्विन ८-२-१३-०, विराट कोहली १.१-०-५-०, रवींद्र जडेजा १-०-१-०.