पंजाब किंग्सचा कोलकातावर विश्वविक्रमी विजय

२६१ धावांचा यशस्वी पाठलाग : जॉनी बेअरस्टोचे शतक, प्रभसिमरन, शशांक सिंगचे अर्धशतक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 12:28 am
पंजाब किंग्सचा कोलकातावर विश्वविक्रमी विजय

कोलकाता : आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात धावांचा पाठलाग करतानाचा नवा विक्रम रचत पंजाब किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध ऐतिहासिक विजय साकारला. इडन गार्डन्सच्या मैदानावर चौकार-षटकारांची लयलूट झालेल्या लढतीत कोलकाताने २६१ धावांचा डोंगर उभारला. पंजाबच्या फलंदाजांनी वादळी खेळी रचत अशक्यप्राय वाटणारा विजय साकारला.पंजाबने ८ चेंडू आणि ८ विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवला. कोणत्याही टी-२० स्पर्धेत धावांचा पाठलाग करतानाची ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या सामन्यात विक्रमी ४२ षटकारांची लयलूट झाली. दोन्ही संघांनी मिळून ५२३ धावा चोपल्या.
शतकवीर जॉनी बेअरस्टोने या विजयाचा पाया रचला. प्रभसिमरन सिंग, रायली रुसो आणि शशांक सिंग यांनी बेअरस्टोला तोलामोलाची साथ देत थरारक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. बेअरस्टोने ४८ चेंडूत १०८ धावांची नाबाद खेळी साकारली. शशांक सिंगने २८ चेंडूत नाबाद ६८ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली.
पंजाबने प्रयोग सुरू ठेवत जॉनी बेअरस्टोच्या बरोबरीने प्रभसिमरन सिंगला सलामीला पाठवले. हा प्रयोग यशस्वी ठरला. प्रभसिमन-बेअरस्टो जोडीने पॉवरप्लेमध्येच ९३ धावांची तडाखेबंद सलामी दिली. प्रभसिमरनने १८ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. सुनील नरेनच्या अचूक धावफेकीमुळे प्रभसिमरन बाद झाला. त्याने २० चेंडूत ४ चौकार आणि ५ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. प्रभसिमरन बाद झाल्यानंतर रायली रुसोने बेअरस्टोला चांगली साथ दिली. संघातून वगळल्यानंतर कसून सराव केलेल्या बेअरस्टोने चौकार, षटकारांची आतषबाजी केली. बेअरस्टो-रुसो जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत ८५ धावा रचल्या. सुनील नरेनने रुसोला माघारी परतावलं. त्याने १६ चेंडूत २६ धावा केल्या. रुसोच्या जागी आलेल्या शशांक सिंगने पहिल्या चेंडूपासून केकेआरच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. एकामागोमाग एक षटकार लगावत शशांकने धावगतीचे दडपण खाली आणले. बेअरस्टोने ४५ चेंडूत शतक साजरे केले. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा वातावरणातही बेअरस्टोने शतक झळकावले. या स्पर्धेतले बेअरस्टोचे हे दुसरे शतक आहे. शशांक सिंगने २८ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ६८ धावा करत पंजाबच्या स्वप्नवत विजयावर शिक्कामोर्तब केले. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूत ८४ धावा कुटल्या.कोलकाताने रचला होता डोंगर
तत्पूर्वी २२ चौकार आणि १८ षटकारांच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने २६१ धावांचा डोंगर उभारला. फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी १३८ धावांची खणखणीत सलामी दिली. या जोडीने पंजाबच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवल्या. शतकाकडे वाटचाल करणाऱ्या नरेनची खेळी राहुल चहरने संपुष्टात आणली. त्याने ३२ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ७१ धावांची खेळी केली. विकेटकीपिंग आणि सलामी अशा दोन्ही भूमिका निभावणाऱ्या सॉल्टने पॉवरप्लेनंतरही फटकेबाजी सुरुच ठेवली. सॅम करनच्या गोलंदाजीवर चौकार-षटकारांची लयलूट केल्यानंतर एका सुरेख यॉर्करवर तो त्रिफळाचीत झाला. त्याने ३७ चेंडूत ६ चौकार आणि ६ षटकारांसह ७५ धावा चोपल्या. चौथ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या ड्रे रस अर्थात आंद्रे रसेलने टोलेबाजीला सुरुवात केली. पण अर्शदीपने त्याचा झंझावात रोखला. रसेलने १२ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावा केल्या. कर्णधार श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर जोडीने चौथ्या विकेटसाठी १८ चेंडूत ४३ धावा जोडल्या आणि कोलकाताने अडीचशेचा टप्पा ओलांडला. धावबाद होण्यापूर्वी वेंकटेशने २३ चेंडूत ३९ धावांची खेळी केली. श्रेयसने १० चेंडूत २८ धावा कुटल्या. कोलकाता एकाक्षणी तीनशेचा टप्पा ओलांडणार असे चित्र होते पण पंजाबच्या गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केले. पंजाबकडून अर्शदीपने २ तर सॅम करन, हर्षल पटेल, राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.


आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार
२४ - पंजाब विरुद्ध कोलकाता, कोलकाता, २०२४
२२ - हैदराबाद विरुद्ध बेंगळूरू, बेंगळुरू, २०२४
२२ - हैदराबाद विरुद्ध दिल्ली, दिल्ली, २०२४
२१ - बेंगळूरू विरुद्ध पुणे, बेंगळुरू, २०१३


पुरुषांच्या टी-२० सामन्यात सर्वाधिक षटकार
४२ - कोलकाता विरुद्ध पंजाब, कोलकाता, आयपीएल २०२४
३८ - हैदराबाद विरुद्ध मुंबई, हैदराबाद, आयपीएल २०२४
३८ - बेंगळूरू विरुद्ध हैदराबाद, बेंगळुरू, आयपीएल २०२४
३७ - बल्ख लिजेंड्स विरुद्ध काबुल झ्वानान, शारजाह, एपीएल २०१८/१९


आयपीएल सामन्यातील एकत्रित सर्वोच्च धावसंख्या
५४९ - बेंगळूरू विरूद्ध हैदराबाद, बेंगळुरू, २०२४
५२३ - हैदराबाद विरूद्ध मुंबई, हैदराबाद, २०२४
५२३ - कोलकाता विरूद्ध पंजाब, कोलकाता, २०२४
४६९ - चेन्नई विरुद्ध राजस्थान, चेन्नई, २०१०
४६५ - दिल्ली विरुद्ध हैदराबाद, दिल्ली, २०२४


आयपीएलमधील सर्वोच्च लक्ष्यांचा यशस्वी पाठलाग
२६२ - पंजाब विरुद्ध कोलकाता, कोलकाता, २०२४
२२४ - राजस्थान विरुद्ध पंजाब, शारजाह, २०२०
२२४ - राजस्थान विरुद्ध कोलकाता, कोलकाता, २०२४
२१९ - मुंबई विरुद्ध चेन्नई, दिल्ली, २०२१


पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च लक्ष्यांचा यशस्वी पाठलाग
२६२ - पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स, कोलकाता, आयपीएल २०२४
२५९ - दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, सेंच्युरियन, २०२३
२५३ - मिडलसेक्स विरुद्ध सरे, ओव्हल, टी-२० ब्लास्ट २०२३
२४४ - ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, ऑकलंड, २०१८
२४३ - बल्गेरिया विरुद्ध सर्बिया, सोफिया, २०२२
२४३ - मुलतान सुलतान विरुद्ध पेशावर झाल्मी, रावळपिंडी, पीसीएल २०२३