बोरी येथे गांजाची शेती करणारा सिव्हिल इंजिनियर अटकेत

युवराज बोरकरकडून ८.५ लाख रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त


27th April, 12:15 am
बोरी येथे गांजाची शेती करणारा सिव्हिल इंजिनियर अटकेत

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने (एएनसी) बोरी येथे छापा टाकून हायड्रोपोनिक तंत्राद्वारे उच्च दर्जाच्या गांजाची लागवड करणारी प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला. या प्रकरणी एएनसीने युवराज बोरकर (३१, बोरी - फोंडा) या सिव्हिल अभियंत्याला अटक केली. त्याच्याकडून ८.५ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम एमडीएमए, १ किलो गांजा आणि १५० ग्रॅम हायड्रोपोनिक तंत्राद्वारे लागवड केलेला उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला आहे.
एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, बोरी-फोंडा येथील एक युवक अमलीपदार्थ तस्करीत गुंतल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल आणि उपअधीक्षक नेर्लोन अल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजित पिल्ले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गारुडी व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने गुप्तहेरांनी दिलेल्या ठिकाणी शुक्रवारी छापा टाकून हायड्रोपोनिक तंत्राद्वारे उच्च दर्जाच्या गांजाची लागवड करणा‍‍‍ऱ्या प्रयोगशाळेचा पर्दाफाश केला. त्यावेळी पथकाने युवराज बोरकर (३१, बोरी - फोंडा) याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. तो विदेशी संकेतस्थळावरून उच्च दर्जाच्या गांजाची लागवड करण्यासाठी बियाणे मागवत असल्याची माहिती मिळाली. तो आपल्या घरात हायड्रोपोनिक तंत्राद्वारे उच्च दर्जाच्या गांजाची लागवड करत असल्याचे समोर आले. पथकाने त्याच्याकडून ८.५ लाख रुपये किमतीचे १५ ग्रॅम एमडीएमए, १ किलो गांजा आणि १५० ग्रॅम हायड्रोपोनिक तंत्राद्वारे लागवड केलेला उच्च दर्जाचा गांजा जप्त केला. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक प्रियंंका गारुडी यांनी बोरकर याच्याविरोधात अमलीपदार्थ विरोधी कायद्याचे कलम २० (बी)(ii)(बी) आणि २२ (सी) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.                   

हेही वाचा