संविधानाच्या वादात आज मोदींची सांकवाळात सभा

भाजपकडून जय्यत तयारी; गोमंतकीयांचे भाषणाकडे लक्ष


27th April, 12:10 am
संविधानाच्या वादात आज मोदींची सांकवाळात सभा

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये शाब्दिक द्वंद्व कायम असतानाच, भाजपच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शनिवारी दक्षिण गोव्यातील सांकवाळ येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेत मोदी पुन्हा विरियातो आणि काँग्रेसवर हल्लाबाेल चढवणार असल्याची शक्यता असल्याने संपूर्ण गोमंतकीय जनतेचे लक्ष शनिवारच्या सभेकडे असणार आहे.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता सांकवाळ येथील बिर्ला मंदिरासमोरील मैदानात पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. प्रदेश भाजपने या सभेची जय्यत तयारी केली असून, ५० हजारांपेक्षा अधिक नागरिकांना सभास्थळी आणण्याचे नियोजन भाजपने केले आहे. आजी-माजी मंत्री तसेच आमदारांनी गेल्या चार दिवसांपासून या सभेसाठी कंबर कसली असून, आपापल्या मतदारसंघातून अधिकाधिक नागरिकांना सभास्थळी आणण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत.
भाजपने उत्तर गोव्याची उमेदवारी सलग सहाव्यांदा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना दिली आहे. तर, दक्षिण गोव्याची उमेदवारी यावेळी प्रथमच पल्लवी धेंपो यांच्या रूपाने महिलेला दिली आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्याची जागा भाजपच्या हातून निसटली होती. त्यामुळे पंतप्रधान मोदींसह भाजपच्या केंद्रातील इतर ज्येष्ठ नेत्यांनी सुरुवातीपासूनच दक्षिण गोव्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते. भाजपच्या स्थानिक आ​णि केंद्रीय नेत्यांनी दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो यांच्या प्रचारावर अधिक भर दिला असतानाच, काँग्रेसकडून दक्षिण गोव्याच्या रणांगणात असलेल्या कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी काही दिवसांपूर्वी दक्षिण गोव्यातील एका सभेत बोलताना, केंद्राने भारतीय संविधान गोमंतकीय जनतेवर लादले. हे आपण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सांगितले आणि त्यांनीही ते मान्य केल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह भाजपचे सर्वच स्थानिक नेते, मंत्री, आमदार विरियातो फर्नांडिस काँग्रेसवर तुटून पडले. त्याचवेळी छत्तीसगड येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विरियातोंच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस उमेदवाराने संविधानविरोधी वक्तव्य करत संविधानासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे. देशात फूट पाडण्याची काँग्रेसची ही नवी चाल असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद गोव्यासह देशभरातही उमटले होते.
दरम्यान, विरियातोंच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अजूनही शमलेला नसतानाच मोदी शनिवारी विरियातो यांच्याच तालुक्यात सभा घेत असल्याने ते नेमके काय बोलणार, याकडे सर्वांच्याच नजरा आहेत.
मोदींपासून स्टार प्रचारकांच्या सभांना प्रारंभ
लोकसभा निवडणुकीतील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी गोव्यासाठीच्या स्टार प्रचारकांची नावे जाहीर केली आहेत. मतदानास अवघे दहा दिवस शिल्लक असतानाही एकाही स्टार प्रचारकाची सभा झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेपासून भाजपच्या सर्वच स्टार प्रचारकांच्या सभांना सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिली.              

हेही वाचा