गोव्यात एकाच दिवसात तीन अपघात; एक ठार, सहा जखमी

गिरीत उड्डाणपुलावरून कोसळला ट्रक; शिवोलीत झाडाला धडक; उसगावात दोन दुचाकींची टक्कर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th April, 03:46 pm
गोव्यात एकाच दिवसात तीन अपघात; एक ठार, सहा जखमी

गोव्यात अपघातांच्या मालिकांमध्ये आज तीन ठिकाणच्या अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये गिरी-म्हापसा येथे झालेल्या भीषण अपघातात एक कामगार ठार झाला आहे. तर तिन्ही अपघातांत मिळून एकूण तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. एकाच दिवसात घडलेल्या या घटनांमुळे अपघाताचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


गिरी येथे सर्व्हिस रोडवर कोसळून उलटा झालेला ट्रक.

म्हापसा : गिरी येथील ग्रीनपार्क जंक्शनजवळील उड्डाण पुलावरून कचरावाहू ट्रक सर्व्हिस रोडवर कोसळून झालेल्या भीषण अपघातात सल्मॉन हेंब्रॉम (२१, थिवी; मूळ झारखंड) हा कामगार ट्रकखाली चिरडून जागीच ठार झाला. तर चौघेजण जखमी झाले. त्यातील एकाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये प्रमेशल मवंदी (२१), सोरबेश मवंदी (१७), बुद्धिराम मवंदी (१७) व चालक बहिराम मवंदी (२६) यांचा समावेश आहे. हे सर्वजण मूळ झारखंडचे रहिवासी आहेत.

हेही वाचा

राज्यात साडेतीन महिन्यांत ९२ अपघात, ९७ मृत्यू

प्रमेशल मवंदी हा ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकल्याने त्याच्या हाताला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर म्हापसा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू आहेत. तर इतर तिघांनी जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून उडी घेतल्याने ते किरकोळ जखमी झाले.

हा अपघात आज पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडला. जखमी व मृत हे थिवी येथील सेड्रीक डिसोझा यांच्याकडे कामाला होते. तिथेच वास्तव्यास होते. जीए-०३के-०८३७ क्रमांकाचा हा कचरावाहू आयचर ट्रक थिवीहून पणजीच्या दिशेने कचरा आणण्यासाठी जात असतानाच हा अपघात घडला.

कचरावाहू ट्रक राष्ट्रीय महामार्गावरील गिरी येथील ग्रीन पार्कजवळील उड्डाण पुलावर पोहोचला तेव्हा चालक बहिराम याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व ट्रकने उजव्या बाजूने दुभाजकाला धडक दिली. नंतर चुकीच्या मार्गावर जाऊन हा भरधाव ट्रक पुलावरील संरक्षक कठडा तोडून खाली सर्व्हिस रोडवर कोसळला. अपघातावेळी सल्मॉन हेंब्रॉम व इतर दोघे ट्रकच्या मागेच बसला होते. अपघातात सल्मॉन हेंब्रॉम जागीच ठार झाला.

अपघात घडताच ट्रकची संरक्षक कठड्याला ठोकर बसताच चालक बहिराम व मागे बसलेले मोरबेश व बुद्धीराम या तिघांनी जीव वाचवण्यासाठी ट्रकमधून बाहेर उडी घेतली. तर, प्रमेशल याला कॅबिनमधून बाहेर पडता आले नाही. तसेच मागे बसलेल्या सल्मॉन हेंब्रॉम यालाही बाहेर उडी मारता आली नाही आणि सर्व्हिस रस्त्यावर पलटी झालेल्या ट्रकखाली तो चिरडला गेला.

या अपघाताची माहिती सकाळी ६ च्या सुमारास म्हापसा पोलीस व अग्निशमन दलाला मिळाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत व सहकारी जवानांनी घटनास्थळी धाव घेतली व ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या जखमीला बाहेर काढले. त्यानंतर ट्रकखाली चिरडलेल्या मयताचा मृतदेह बाहेर काढला.

म्हापसा पोलीस उपनिरीक्षक अजय धुरी व हवालदार अभिजीत माणगांवकर यांनी पंचनामा केला. ट्रक चालक बहिराम याच्या विरुद्ध पोलिसांनी भा.दं.सं.च्या कलमांतर्गत निष्काळजीपणे वाहन हाकणे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

मार्ना-शिवोली येथे अपघातग्रस्त झालेला टेम्पो.

दरम्यान, वरील अपघाताचा पंचनामा सुरू असतानाच शिवोलीतून टेम्पोचा स्वयंअपघात झाल्याची बातमी आली. मार्ना-शिवोली येथील उतरणीवर ब्रेक निकामी झाल्याने टेम्पोची झाड आणि संरक्षक कठड्याला धडक बसली. यात चालक जखमी झाला. 

उसगावात दोन दुचाकींची धडक; एकटा गंभीर जखमी

पार-उसगाव येथील अपघातग्रस्त वाहने

फोंडा : पार-उसगाव येथे दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात मोहित महादेव नाईक (१८, मुरमणे-गुळेली) हा दुचाकी चालक गंभीर तर विराज शेटकर (भामई-पाळी) हा किरकोळ जखमी झाला. गंभीर मोहित नाईक याला अधिक उपचारांसाठी गोमेकाँत दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार-उसगाव येथील जीए-०४पी-३५६६ आणि जीए-०५एच-१०५२ या दोन दुचाकींमध्ये टक्कर झाली. यात चालक मोहित नाईक हा गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून फोंड्यातील उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सज्योत सावंत यांनी अपघाताचा पंचनामा केला.

हेही वाचा