'आरजीपी'च्या मनोज परब य‍ांच्याकडे केवळ ३.१२ लाख‍ांची संपत्ती!

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
18th April, 03:54 pm
'आरजीपी'च्या मनोज परब य‍ांच्याकडे केवळ ३.१२ लाख‍ांची संपत्ती!

पणजी : आरजी पक्षाचे उत्तर गोव्यातील उमेदवार मनोज परब यांच्याकडे ३ लाख १२ हजार ४६९ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पत्नी वीणा यांच्याकडे १ लाख ८० हजार रुपयांची मालमत्ता आहे. परब यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती मिळाली आहे. त्यांनी गुरुवारी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

परब दांपत्याकडे कोणत्याही प्रकारची कृषी आणि बिगर कृषी जमीन नाही. तसेच व्यवसायिक किंवा रहिवासी इमारत देखील नसल्याचे प्रतिज्ञा पत्रात नमूद केले आहे. मनोज यांच्याकडे हातात ३० हजार रुपये रोख रक्कम आहे. तर त्यांच्या बँक खात्यात १ लाख ३२ हजार ६४९ रुपये आहेत. वीणा यांच्याकडे हातात १० हजार रुपये रोख रक्कम आहे. तर १ लाख ७० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. मनोज यांच्याकडे एक चार चाकी तर त्यांच्या पत्नीकडे एक दुचाकी आहे.

मनोज परब अथवा त्यांच्या पत्नी विना यांच्यावर कसलेही कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. मनोज यांनी २००८ मध्ये गोवा विद्यापीठातून जिओलोजी या विषयातून पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्यांच्या विरोधात वाळपई पोलीस स्थानकात २ तर पणजी, फोंडा आणि म्हापसा पोलीस स्थानकात प्रत्येकी एक अशा एकूण ५ एफआयआर नोंदवण्यात आल्या आहेत. या पाचही प्रकरणात न्यायालयात खटला सुरू आहे.

हेही वाचा