इलेक्टोरल बाँडमागील हेतू प्रामाणिकच होता !

माॅविन गुदिन्हो : सांकवाळ उपसरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश


18th April, 01:05 am
इलेक्टोरल बाँडमागील हेतू प्रामाणिकच होता !

सांकवाळचे उपसरपंच गिरीश पिल्ले यांचे पक्षात स्वागत करताना प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे. सोबत मंत्री मॉविन गुदिन्हो व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : निवडणूक काळात होणाऱ्या काळ्या धनाचा वापर रोखण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘इलेक्टोरल बाँड’ ही संकल्पना आणली होती, असे मत वाहतूकमंत्री माॅविन गुदिन्हो यांनी व्यक्त केले. बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, गोवा प्रभारी आशिष सूद हेही उपस्थित होते. यावेळी सांकवाळचे उपसरपंच गिरीश पिल्ले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
मंत्री गुदिन्हो पुढे म्हणाले की, राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या निधीत पारदर्शकता असावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलेक्टोरल बाँड सुरू केले होते. निवडणूक काळात काळ्या धनाचा वापर होतो याबाबत लोक चर्चा करत होते. यावर उपाय म्हणून इलेक्टोरल बाँड पद्धत स्वीकारली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचा याबाबत वेगळा दृष्टिकोन आहे. असे असले तरी पंतप्रधानांचा हेतू नक्कीच चांगला होता.
पिल्ले यांच्या भाजप प्रवेशाबाबत मंत्री गुदिन्हो म्हणाले, गिरीश पिल्ले भाजपमध्ये आल्याने दक्षिण गोव्यात भाजपचे बळ वाढले आहे. दाबोळी मतदासंघात भाजपला दुप्पट मते मिळतील. झुआरीनगर, लमाणीनगर येथे आम्ही मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गोव्यातील मतदारांनी भाजपचे काम पाहिले आहे. त्यांचा पक्षावर विश्वास आहे. त्यामुळेच नवीन लोक आमच्या पक्षात येत आहेत.
गेल्या महिनाभरात भाजपमध्ये मोठ्या संख्येने पंच, सरपंच, सामाजिक कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप हेच देशाला पुढे नेऊ शकतात, हे समजले आहे. याउलट इंडी आघाडी दिशाहीन झाली आहे. यामुळे अनेक नेते, कार्यकर्ते भाजपकडे येत आहेत. पिल्ले यांच्या प्रवेशाने भाजप अधिक मजबूत झाली आहे.
_ सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष, भाजप