शेळपेत ९० टक्के घरांत शौचालयच नाही !

प्रातर्विधी, पिण्याच्या पाण्यासाठी ओहोळांचाच आधार


20th October 2017, 03:31 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता

वाळपई : शेळपे गावातील नागरिकांना गेल्या पंधरा दिवसांपासून लागण होत असलेल्या विविध आजारांमागे ओहोळातील दूषित पाणी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तेथे खळबळ उडाली आहे. शेळपेतील सुमारे ९० टक्के घरांमध्ये शौचालय नसल्यामुळे तेथील नागरिक प्रातर्विधी आणि पिण्याच्या पाण्यासाठी याच ओहोळांचा वापर करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गोवा मुक्तीनंतर राज्यात अनेक पक्षांची सरकारे सत्तेवर आली. मात्र स्वच्छतेचे नारे देण्यापलिकडे त्यांनी काहीच केले नसल्याची प्रतिक्रिया सध्या शेळपेतील स्थानिकांतून व्यक्त होत आहे. गावातील ९० टक्के घरांमध्ये शौचालय नसल्याचे उघड झाल्यामुळे सरकारच्या ‘स्वच्छ भारत योजने'चा खेळखंडोबा झाल्याचे दिसून येत आहे. दर पाच वर्षांनी सत्तेवर येणारी सरकारे मोफत शौचालयांची योजना राबवितात. पण या योजनेचा लाभ अद्याप शेळपेला मिळालेला नसून, गावाला या योजनेपासून दूर ठेवण्यामागचे कारणही अजून स्पष्ट झालेले नाही. गावची लोकसंख्या ४०० च्या आसपास असून, हा भाग नगरगाव पंचायत क्षेत्रातील महत्त्वाचा असल्याचे मानले जात असतानाही आपल्या गावावर सरकारकडून का अन्याय होत आहे, असा सवाल येथील जनता उपस्थित करू लागली आहे. शौचालये नसल्यामुळे येथील नागरिकांना प्रातर्विधीसाठी पावसाळ्यात नाल्यावर व इतर मोसमात उघड्यावर जाण्याची वेळ येत आहे. त्यामुळेच नागरिकांना विविध आजारांना बळी पडावे लागत आहे. यावरून धडा घेऊन सरकार आतातरी येथील येथील नागरिकांना शौचालयांची व्यवस्था करून देणार का, असाही सवाल नागरिक करीत आहेत. स्थानिक नागरिक फटी शाबलो गावकर म्हणाले, सरकारने गावातील लोकांना शौचालये बांधून दिली, तरच ही समस्या सुटणार आहे. सध्या येथील जनता बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहे. स्वत: खर्च करून शौचालय बांधणे आम्हाला शक्य नसल्याचे ते म्हणाले. शौचालय नसल्याने लोक उघड्यावर शौच करीत आहेत. लोकांना शौचालये बांधून दिली तरच हा प्रश्न सुटणार असल्याचे महादेव चोर्लेकर म्हणाले.
दरम्यान, वाळपईतील पाणी पुरवठा खात्यात याबाबत चौकशी केली असता, गेल्या पाच वर्षांत नगरगाव पंचायत क्षेत्रासाठी एकाही शौचालयाला मान्यता मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले. या पंचायत क्षेत्रात अनेक घरांसाठी मोफत शौचालयांचा प्रस्ताव तयार करून तो सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र त्याला अजूनही मंजुरी न मिळाल्याने शेळपेत शौचालयांची व्यवस्था होऊ शकलेली नाही, अशी माहिती पाणी पुरवठा खात्याच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
कोट
शेळपेतील अनेक घरांमध्ये शौचालय नाही, ही गोष्ट खरी आहे. मी चार महिन्यांपूर्वीच सरपंच झालो आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवण्यासाठी काही वेळ लागेल. वाळपईचे आमदार तथा आरोग्यमंत्र्यांना याबाबत सविस्तर माहिती देऊन येथील समस्या लवकरात लवकर सोडवू.
- पराग खाडीलकर, सरपंच, नगरगाव
कोट
शौचालय बांधून मिळावे, अशी मागणी आपण अनेक वर्षांपासून नगरगाव पंचायतीकडे करीत आहे. पण अद्याप आम्हाला शौचालय बांधून मिळालेले नाही. त्यामुळे गावातील अर्ध्यापेक्षा अधिक जनतेला दोन ओहोळांचा आधार घ्यावा लागत आहे.
- रुक्मिणी गावकर, स्थानिक
शेळपेवासीयांनी सरकारला केलेले प्रश्न
१आरोग्य खात्याने उघड्यावर, ओहोळाच्या ठिकाणी शौचास जाऊ नये असे सूचित केले आहे. पण आमच्या घरी शौचालयच नाही. मग आम्ही जायचे कुठे?
२ शेळपेवासीयांना मोफत शौचालये बांधून देण्यास सरकार अपयशी ठरले आहे. आजपर्यंत अनेक नागरिकांनी मोफत शौचालयासाठी संबंधित खात्यात अर्ज सादर केले आहेत. पण आजपर्यंत त्यांच्या अर्जांचा विचार का झालेला नाही?
३ गावातील अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीत शौचालये बांधणे अशक्य आहे. यात आम्ही करायचे काय?