शेळपेत फैलावत चाललेले आजार ओहोळांतील दूषित पाण्यामुळेच!


20th October 2017, 03:30 am
 पाण्यात आढळले शिगेला बॅक्टेरिया जीवाणू
 आरोग्य खात्याकडून अहवाल सादर
 आज डॉक्टरांकडून जनजागृती
प्रतिनिधी। गोवन वार्ता
नगरगाव : नगरगाव पंचायत क्षेत्रातील शेळपे गावात गेल्या पंधरा दिवसांपासून फैलावत असलेल्या उलट्या, जुलाब, पोटदुखीचे कारण अखेर गुरुवारी स्पष्ट झाले. शेळपेवासीय पिण्यासाठी ज्या ओहोळातील पाण्याचा वापर करतात, त्यात शिगेला बॅक्टेरिया जीवाणू सापडले आहेत. त्यामुळेच स्थानिकांत असे आजार पसरत असल्याचा अहवाल गुरुवारी आरोग्य खात्याकडून प्राप्त झाल्याची माहिती वाळपई रुग्णालयाचे आरोग्याधिकारी डॉ. गजानन नाईक यांनी दिली.
यासंदर्भात बोलताना डॉ. नाईक म्हणाले, शेळपेतील नागरिक ओहोळातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करतात. शिवाय गावात शौचालयांची कमतरता असल्यामुळे याच ठिकाणी प्रातर्विधीही उरकले जातात. गावात दोन ओहोळ असून, गेल्या शुक्रवारी दोन्ही ओहोळांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. तपासणी दरम्यान त्या पाण्यात शिगेला बॅक्टेरिया असल्याचे आढळून आले. शुक्रवारी डॉक्टरांचे पथक शेळपेत जाऊन लोकांमध्ये जागृती करणार आहेत. स्थानिकांनी ओहोळांच्या ठिकाणी शौचास जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शेळपेतील जनता गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून विविध आजारांनी त्रस्त आहे. उलट्या, जुलाब, पोटदुखी असे आजार या परिसरात वेगाने फैलावत असून, उपचारांसाठी लोक वाळपई सरकारी रुग्णालयात तसेच खासगी दवाखान्यांत गर्दी करीत आहेत. आजारांचे स्वरूप लक्षात घेऊन वाळपई रुग्णालयातील डॉक्टरांनी या आजारांचे कारण शोधण्यास सुरुवात केली व दोन्ही ओहोळांतील पाण्याबरोबरच बोअरवेलच्या पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवून दिले होते. पण बोअरवेलच्या पाण्यात काहीच सापडले नव्हते. त्यामुळे डॉक्टरांसह स्थानिकांना ओहोळांतील पाण्याच्या अहवालाची प्रतीक्षा होती. शेवटी गुरुवारी त्याचा अहवाल प्राप्त झाल्याने या आजारांचे नेमके कारण स्पष्ट झाले.
काय आहे शिगेला बॅक्टेरिया?
  पाण्याच्या ठिकाणी शौच केल्यास पाण्यात सूक्ष्म जीवाणू तयार होऊन ते पाण्याबरोबर वाहतात किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर हात न धुता जेवल्यास हातावरील जीवाणू माणसाच्या पोटात जाऊन शरीरावर परिणाम होतो.
  शिगेला बॅक्टेरियामुळे आजारी पडलेल्या रुग्णांत पातळ संडास, उलट्या, पोटात दुखणे, ताप येणे अशी लक्षणे दिसून येतात.
  शेळपेतील रुग्णांमध्ये अशी लक्षणे दिसून आल्यानंतर १४ जणांचे मलमूत्र, थुंकी, रक्त तपासणीसाठी मणिपाल संशोधन केंद्राने घेतले होते. त्यापैकी पाच जणांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यांच्या मलमूत्रात शिगेला बॅक्टेरिया आढळून आले आहेत.
  ओहोळातील पाणी दूषित असून, ते पिण्यायोग्य नसल्याचे आरोग्य खात्याच्या अहवालात म्हटले आहे.