महाराष्ट्रातील ‘एसटी संप'चा कदंबला फटका

तीन दिवसांत पाच लाखांचा महसूल बुडाला; प्रवाशांचेही हाल


20th October 2017, 03:30 am
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गोव्यातील प्रवाशांचीही मोठी गैरसोय झाली आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे गेल्या तीन दिवसांपासून कदंब महामंडळाने कदंब बसेस महाराष्ट्रात न सोडण्याचा निर्णय घेतला असल्याने कदंबचा दर दिवशी १ लाख ७० हजार रुपयांचा महसूल बुडत आहे. महाराष्ट्र सरकारने कदंब बसेसना पोलिस संरक्षण दिल्यास बसेस महाराष्ट्रात सोडण्याचा निर्णय गोवा सरकार घेईल, अशी माहिती कदंब महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी गुरुवारी ‘गोवन वार्ता'शी बोलताना दिली.
सध्या गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पत्रादेवीपर्यंत कदंबच्या बसेस सुरू आहेत. तसेच रात्रीच्या वेळी मुंबई, पुणे व शिर्डी या तीन ठिकाणी जाणाऱ्या बसेस सुरू आहेत. सध्यातरी कदंबच्या कोणत्याही बसची मोडतोड झालेली नाही. पण संप कधीही चिघळू शकतो व त्यात बसची हानी होऊ शकते, हा धोका लक्षात घेऊन बसेस महाराष्ट्रात सोडण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्र सरकारने कदंब बसेसच्या सुरक्षेची जबाबदारी घेतली, तरच बसेस सुरू करण्यात येतील. संप मिटल्यानंतर मात्र तत्काळ बसेस सुरू होतील, असे आल्मेदा म्हणाले. दरम्यान, संपामुळे गोव्यात कामाला असलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना दिवाळीसाठी गावी जाण्यास मोठी अडचण निर्माण झाली. त्यामुळे अनेकांनी गोव्यातच दिवाळी साजरी करणे पसंत केले, तर काही जणांनी खासगी बसेसचा आधार केला. संपामुळे खासगी वाहतुकदारांकडून मात्र प्रवाशांची मोठी लूट होत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांशी कामगार गैरहजर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील मोठ्या संख्येने कामगारवर्ग कामासाठी गोव्यात येतो. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचा संप सलग तीन दिवसांपासून सुरू असल्याने कामगारांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यांना कामासाठी गोव्यात येण्यास अडथळे येत असल्याने अनेक कंपन्यांमधील तसेच व्यावसायिक आस्थापनांमधील कामगार गैरहजर आहेत.