आगीतील कागदपत्रे उघड्यावर फेकल्याने वाहतूक खाते लक्ष्य

संगणकीय नोंदणी झाल्याने न घाबरण्याचे आवाहन


20th October 2017, 03:15 am
आगीतील कागदपत्रे उघड्यावर  फेकल्याने वाहतूक खाते लक्ष्यप्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : २ ऑक्टोबर रोजी कदंब बसस्थानकावर लागलेल्या आगीत पहिल्या मजल्यावरील आरटीओ कार्यालयातील ज्या कागदपत्रांचे नुकसान झाले होते, ती कागदपत्रे आणि विविध दस्तावेज मेरशी ते जुनेगोवेच्या बगलमार्गानजीक उघड्यावर फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे वाहतूक खात्याची भंबेरी उडाली असून, खाते टीकेचेही लक्ष्य झाले आहे.
आगीत जळालेली कागदपत्रांची तपासणी न करता शिवाय खराब न झालेली कागदपत्रे वेगळी न करता ती उघड्यावर फेकण्यात आल्याने वाहतूक खात्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. या घटनेची वाच्यता झाल्यानंतर वाहतूक खात्याकडून गुरुवारी यासंबंधीचे स्पष्टीकरण देण्यात आले. पणजी आरटीओ कार्यालयातील नोंदणी आणि इतर दस्तावेजांची २००६ पासून संगणकीय नोंद झाली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही, असे वाहतूक खात्याकडून सांगण्यात आले आहे. वाहतूक खात्याकडे वेगवेगळ्या कारणांसाठी केलेले अर्ज आणि त्यासोबतची कागदपत्रे आगीत भस्मसात झाली असून, त्याची प्रक्रिया नव्याने करता येणे शक्य आहे. त्यामुळे या विषयावरून कुणीही गैरसमज करून घेऊ नये किंवा घाबरूही नये, असे आवाहन खात्याकडून करण्यात आले आहे. दरम्यान, आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कागदपत्रांची योग्यरित्या विल्हेवाट न लावता बेफिकीर कामगारांनी ती महामार्गानजीक टाकल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात आल्याचा खुलासा गुरुवारी खात्याने केला आहे.
कागदपत्रांची छाननी का झाली नाही ?
आरटीओ कार्यालयातील आगीच्या घटनेत सापडलेली कागदपत्रे आणि इतर दस्तावेज येथील अधिकाऱ्यांकडून तपासण्यात आले नाहीत, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
नवे जुने गोवे बगलमार्गानजीक फेकण्यात आलेल्या या कागदपत्रांची छाननी केली असता, त्यात अनेक कागदपत्रे सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यांची छाननी का झाली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
प्रत्यक्षात जी कागदपत्रे आगीत सापडलेली नाहीत, ती वेगळी काढून काही दस्तावेजांचा पुनर्वापर होऊ शकला असता. पण यासाठी तसदी न घेता सर्वच कागदपत्रे फेकून देण्याचा प्रकार घडला.
या कागदपत्रांचे फोटो बुधवारी सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर गुरुवारी पहाटे कामगारांना पाठवून त्यांच्यावर माती टाकण्यात आली. शिवाय त्यांची विल्हेवाट लावून ती नष्ट करण्यात आली.
हा प्रकार अयोग्यच, चौकशी सुरू : देसाई
वाहतूक खात्याचे संचालक निखील देसाई म्हणाले, आरटीओ कार्यालयातील आगीत सापडलेली कागदपत्रे महामार्गानजीक अशा पद्धतीने उघड्यावर टाकण्याचा प्रकार अयोग्य असून, त्याबाबत चौकशीही सुरू आहे. २००६ पासून येथे नोंदणी झालेल्या वाहनांची सर्व माहिती संगणकांत सुरक्षित आहेत. केवळ १९८५ पूर्वीची काही कागदपत्रे या घटनेत नष्ट झाली आहेत. त्याबाबतची माहिती नव्याने गरजेनुसार तयार केली जाईल. बाहेर फेकलेल्या कागदपत्रांमुळे कुणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी वाहतूक खाते घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.