गोव्यात साईबाबा पादुकांचे आगमन

पत्रादेवी येथे मान्यवरांच्या हस्ते स्वागत : हजारो भाविकांची उपस्थिती


13th October 2017, 04:33 am

पेडणे/धारगळ : प्रतिनिधी
अनंत कोटी ब्रम्हांड नायक श्री साईनाथ महाराज की जय, जय साई ओम साई अशा आसमंत दुमदुमून सोडणाऱ्या घोषणा देत साई भक्तांनी गुरुवारी दुपारी साई बाबांच्या पादुकांचे पत्रादेवी येथे गोव्याच्या सीमेवर हुतात्मा स्मारकाजवळ जल्लोषात स्वागत केले. हजारोंच्या संख्येने साईभक्त या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होते.
साई सेवा ट्रस्ट गोवा आणि साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबांच्या समाधी शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार दि. १३ आणि शनिवार दि. १४ रोजी दोन दिवस बांबोळी येथील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर साई बाबांच्या पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त साईंच्या पादुकांचे आगमन झाले असता येथे जोरदार स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी स्थानिक आमदार तथा राज्याचे पर्यटन तसेच क्रीडा मंत्री बाबू आजगावकर, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर, भाजपचे नेते तथा माजी आमदार दामू नाईक, सदानंद शेट तानावडे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री दीपक केसरकर, उत्तर गोवा जि.पं. सदस्य रमेश सावळ, तोरसेचे सरपंच बबन डिसोझा गोव्याचे साईबाबा ट्रस्टचे अध्यक्ष अनिल खंवटे, सचिव प्रदीप पालयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विवेक आणि वृषाली पार्सेकर यांच्या यजमानपदाखाली साई पादुकांचे विधिवत पूजन करण्यात आले. तसेच आरती झाल्यावर लोकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पोंबुर्ले-देवगड येथील नवतरुण मंडळाने वाजवलेल्या ढोल ताशांच्या वृंदाने उपस्थित लोकांना आकर्षित केले. दुपारी २.१० मिनिटांनी साईरथ पुढे रवाना करण्यात आला.
त्यानंतर उगवे येथे माऊली मंदिर परिसरात साईरथ थांबवून त्या भागातील लोकांना दर्शन दिले. यावेळी काँग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते चंद्रकांत उर्फ बाबु कवळेकर आणि मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे यांनी दर्शन घेतले. यावेळेस मुंबई येथील महिला आणि पुरुष मंडळाने वाजवलेल्या ढोल ताशांच्या वाद्यवृंदाने लोकांची मने जिंकून घेतली. पेडणे मतदारसंघातील पत्रादेवीपासून ही पादुका रथयात्रा सुरू झाली त्याचे मंत्री आजगावकर यांनी स्थानिक आमदार या नात्याने स्वागत केले. गोवावासीयांना ही अभिमानाची बाब आहे. शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन गोव्यातील जनतेला गोव्यातच मिळाले त्याबद्दल त्यांनी आयोजकांचेही आभार मानले.
अनिल खंवटे यांनी आपल्या उपस्थितीत हा दोन दिवसांचा कार्यक्रम गोव्यात होत असून याचा गोवावासीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
पेडणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाहतूक पोलिसांनी आपली कामगिरी चोख बजावली. हळूहळू साईरथ लोकांना पादुकांचे दर्शन घडवत डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी मैदान बांबोळी येथे मार्गस्थ झाला.
श्यामा प्रसाद स्टेडियमवर अवतरली शिर्डी
पणजी : प्रतिनिधी
शिर्डी येथील साईबाबांच्या समाधीला येत्या १८ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने देश-विदेशात साई समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्यानिमित्त साई पादूका दर्शन सोहळा देशभर होणार असून त्याचा शुभारंभ गोव्यातून होत आहे. हा दर्शन सोहळा दि. १३ व १४ रोजी बांबोळी येथील श्यामा प्रसाद स्टेडियमवर होत असून येथे मिनी शिर्डीच अवतरली आहे.
श्यामा प्रसाद स्टेडियमवर साई पादुका दर्शन सोहळ्यासाठी महामंडप उभारण्यात आला असून त्यामध्ये शिर्डीत दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ज्या पद्धतीच्या सुविधा असतात त्याच पद्धतीच्या सुविधा आणि दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्याचे नामांकित वास्तुशिल्पकार महेश नाईक यांनी या महामंडपाचा आराखडा तयार केला असून त्यात पादुका दर्शनासाठी खास सुविधा, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यासाठी खास मंच, महाप्रसादासाठी वेगळा मंडप, पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशामक दलाची छावणी, पत्रकार कक्ष, महनिय पाहुण्यांसाठी कक्ष तसेच साईबाबांशी संबंधित साहित्य व कलाकृतींचे प्रदर्शन व विक्री दालनाचा समावेश आहे. यावेळी धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दर्शन सोहळा साई भक्तांसाठी पर्वणीच
साई पादुका सोहळ्यासाठी आकर्षक असा साईरथ तयार केला आहे. नवीन वातानुकूलित बसची खरेदी करण्यात आली आहे. या साई रथामध्ये पादुकांची विशेष काळजी घेण्यात आली आहे. हा दर्शन सोहळा साई भक्तासांठी पर्वणीच ठरणार आहे.