खनिज वाहतूक दर १४ रु. न मिळाल्यास आंदोलन

धारबांदोडा तालुका ट्रक संघटनेचा इशारा; १ नोव्हेंबरला रास्ता रोको


13th October 2017, 01:30 am
प्रतिनिधी : फोंडा
३० आॅक्टोबरपर्यंत खनिज वाहतूक दर प्रतिटन प्रतिकिलोमीटर १४ रुपये न दिल्यास १ नोव्हेंबरला राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा धारबांदोडा तालुका ट्रक संघटनेने दिला आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत खाण कंपन्या आणि ट्रक मालकांना विश्वासात घेऊन खनिज वाहतूक दर निश्चित करण्यात आला होता. दहा किलोमीटरसाठी १२.५० रुपये, ११ ते १९ किलोमीटरसाठी १२ रुपये व २० किमीपेक्षा अधिक अंतरासाठी ११.५० रुपये निश्चित केले होते. तसेच सध्या मार्केटात असलेला डिझेलचा दर निश्चित करण्यात आला होता.
मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिलेला हा प्रस्ताव सर्वांसमोर मांडण्यासाठी संघटनेने गुरुवारी कोडली येथे सभा आयोजित केली होती. सावर्डेचे आमदार दीपक पावसकर, संघटनेचे अध्यक्ष विनायक ऊर्फ बालाजी गावस, सावर्डेचे सरपंच संदीप पावसकर, कोषाध्यक्ष जितेंद्र नाईक, प्रकाश देसाई आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी सुमारे ५०० ट्रक मालक उपस्थित होते.
आमदार पावसकर यांनी पर्रीकर यांच्याशी झालेल्या बैठकीत जी चर्चा झाली होती, त्या मुद्द्यांविषयी सर्वांना माहिती दिली. आम्हाला किमान १३.५० रुपये दिले पाहिजेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे आपण केली होती. परंतु दीर्घ विचारानंतर मुख्यमंत्र्यांनी १२.५० रुपये करण्याचा निर्णय घेतला. आता त्याचा स्वीकार करायाचा किंवा नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. यावर बहुतेकांनी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दिलेला दर मान्य नसल्याचे सांगितले.