न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांना निरोप

महत्त्वपूर्ण निवाड्यांमुळे राहिले चर्चेत


13th October 2017, 01:26 am
पणजी : प्रतिनिधी
जनतेच्या प्रश्नांची योग्य जाण असलेले आणि आपल्या अनेक महत्त्वपूर्ण निवाड्यांमुळे लोकप्रिय ठरलेले मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाचे न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांची मुंबई येथे बदली झाल्याने गुरुवारी त्यांना गोवा वकील संघटनेकडून निरोप
देण्यात आला.
खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती एफ. एम. रेईश हे निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी जी. एस. पटेल यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. कायद्याची प्रचंड जाण आणि सामाजिक भान यामुळे अवघ्या काही दिवसांतच न्या. पटेल यांनी आपली छाप टाकली होती. पणजी खंडपीठातील वकिलांमध्ये त्यांच्याबाबत बराच वचक निर्माण झाला होता.
एखाद्या चांगल्या प्रकरणांत न्याय मिळण्याची शक्यता असल्याने न्या. पटेल यांच्या काळात अनेकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचीही माहिती मिळाली आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाकडून पुण्यातील राष्ट्रीय हरित लवादासमोरील गोव्याची प्रकरणे दिल्लीत हस्तांतरण करण्यासंबंधीचा निर्णय रद्दबातल ठरविणारा निवाडा बुधवारी खंडपीठाकडून जाहीर करण्यात आला. या निवाड्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचा मुखभंग झाला आहे.
या व्यतिरिक्त ‘आरटीआय' कार्यकर्ते म्हणून वावरताना कायदा किंवा न्यायपालिकेचा मान राखला जात नसल्याच्या कारणांवरून काशिनाथ शेटये यांची न्या. पटेल यांनी केलेली कानउघडणी मोठा चर्चेचा विषय ठरला होता.