‘त्या’ पोलिसावर कठोर कारवाई

पोलिस अधीक्षकांचा इशारा : सोशल मीडियावरून खात्याच्या बदनामीचा आरोप

13th October 2017, 02:49 Hrs

मडगाव : प्रतिनिधी
फातोर्डा नेहरू स्टेडियमवर सुरू असलेल्या ‘फिफा १७' वर्षांखालील विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यांच्या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना आयोजकांनी प्लास्टिक तांदळाचा भात भोजनात दिल्याची अफवा सोशल मीडियावरून पसरविणाऱ्या पोलिस शिपायावर कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली.
अधीक्षक गावस पुढे म्हणाले, फुटबॉल सामन्याच्या वेळी आपण दोन वेळा आयोजकांनी पाठविलेले भोजन केले असून आपले वरिष्ठ पोलिस अधिकारीही तेच भोजन केलेले आहेत.
बंदोबस्तासाठी तैनात परप्रांतीय पोलिसांनाही तेच भोजन दिले होते. या जेवणाबद्दल कोणाचीही तक्रार आलेली नाही. गोवा पोलिस दलातील एकमेव विघ्नसंतोषी पोलिस शिपायाने प्लास्टिक तांदळाचा भात भोजनात मिळाल्याची अफवा सोशल मीडियावरून उठविली. सोशल मीडियाच्या आधारे त्याची कोणतीही फेरपडताळणी न करता काही वृत्तपत्रांनीही चुकीचा मजकूर प्रसिद्ध केला, हेही अजबच आहे.
शिस्तपालन हे पोलिसांचे सेवेचे पहिले कर्तव्य आहे. संबंधित शिपायाला प्लास्टिक तांदळाचा भात मिळाला असल्यास त्याने त्याबाबत आपल्या वरिष्ठांकडे (पोलिस निरीक्षकांकडे) तक्रार करायला हवी होती. पोलिसांना वरिष्ठांचे आदेश मानावेच लागतात. ते सोशल मीडियावर खात्याला बदनाम करणारी पोस्ट टाकू शकत नाहीत. सोशल मीडियावर प्लास्टिक तांदळाच्या भाताचा फोटो प्रसिद्ध करणाऱ्या पोलिस शिपायाची बेशिस्त स्पष्ट होते.

आयोजकांवर भोजन देण्याची सक्ती नव्हती
विश्वकप फुटबॉल सामन्यांच्या वेळी आयोजकांवर पोलिसांना भोजन देण्याची सक्ती नव्हती. खासगी बंदोबस्तासाठी आयोजकांकडून पोलिसांना कुठेही भोजन दिले जात नाही. पोलिसांची दुपारी १.३० वाजता ड्यूटी सुरू होते आणि रात्री ९.३० वाजता संपते. सकाळी व रात्री त्यांना घरी जेवण करणे शक्य होते. तरीही आपण स्वत:हून आयोजकांशी चर्चा करून पोलिसांना दोन वेळा भोजनाची सोय करण्याची विनंती केली होती.
 अफवा पसरवून पोलिस खात्याला बदनाम करणाऱ्या ‘त्या' पोलिस शिपायाची ओळख पटलेली आहे. जे खाते आपल्याला वेतन देते, त्या वेतनातून आपल्या कुटुंबीयाची उपजीविका चालते, त्याच खात्याला बदनाम करणा‌रे बेशिस्त कर्मचा‌री पोलिस खात्यात काम करण्यास लायक नाहीत. हे बेशिस्तीचे प्रकरण आपण गांभीर्याने घेतले असून संबंधित शिपायावर कडक कारवाई केली जाईल.
- अरविंद गावस, पोलिस अधीक्षक

Related news

कार्निव्हल पर्यटन वाढीसाठी वरदान

मंत्री बाबू आजगावकर यांचे प्रतिपादन : अन्न व संस्कृती महोत्सवाचे उद्घाटन Read more

साखळीत उद्या भव्य कोकणी भजन स्पर्धा

रवींद्र भवन येथे अायोजन : स्वागताध्यक्षपदी सभापती डाॅ. प्रमोद सावंत Read more