ईडीएम आयोजनासाठी दोघांचे अर्ज

डिसेंबरमध्ये कार्यक्रम : सुकाणू समिती घेणार निर्णय


13th October 2017, 02:42 am
ईडीएम आयोजनासाठी दोघांचे अर्ज

पणजी : प्रतिनिधी
गोवा पर्यटन खात्याकडे डिसेंबर महिन्यात ‘इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिवल' (ईडीएम) आयोजनासाठी दोन अर्ज आले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
राज्यात नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त डिसेंबर महिन्यात गेल्या काही वर्षांपासून ईडीएमचे आयोजन केले जात आहे. या ईडीएममध्ये सहभागी होण्यासाठी देश-विदेशांतील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र, २०१६ मध्ये सरकारच्या कडक भूमिकेमुळे ईडीएमचे आयोजन होऊ शकले नाही. या दोन्ही अर्जांवर राज्य पातळीवरील सुकाणू समितीकडून निर्णय घेतला जाणार आहे.
ईडीएममध्ये अमली पदार्थांचा व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने जलस्रोतमंत्री तथा शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी ईडीएम आयोजित करण्याला विरोध केला आहे. त्यानंतर पर्यटनमंत्री आजगावकर यांनी ड्रग्जमुक्त ईडीएम आयोजित करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा खुलासा केला. ईडीएम आयोजित करण्यासाठी कुणालाही मान्यता दिलेली नाही. ईडीएम आयोजकांकडील थकबाकी वसुलीसाठी प्रक्रिया सुरू आहे, असे पर्यटनमंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ईडीएमच्या आयोजनावरून उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. पर्यटन व्यवसायाला बळकटी देण्यासाठी ड्रग्जमुक्त ईडीएम आयोजनावर सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये एकमत झाले.

 परराज्यातील एका कंपनीने डिसेंबर महिन्यात ईडीएम आयोजित करण्यासाठी वृत्तपत्रांतून जाहिरात प्रसिद्ध करून तिकीट विक्रीला सुरुवात केली होती. ईडीएमसाठी कायदेशीर मान्यता न घेता तिकीट विक्री सुरू झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य पातळीवरील सुकाणू समितीने सदर कंपनीला तिकीट विक्री बंद करण्याचा आदेश दिला आहे; परंतु या आदेशाच्या कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यांकडून काहीच माहिती मिळू शकली नाही.