‘विश्वस्त’मध्ये ऐतिहासिक रहस्यांच्या शोधाचा प्रयत्न

पणजीत ‘लेखक तुमच्या भेटीला’ रंगला : लेखक वसंत लिमये यांनी उलगडला कादंबरीचा प्रवास


13th October 2017, 03:40 am
‘विश्वस्त’मध्ये ऐतिहासिक रहस्यांच्या शोधाचा प्रयत्नपणजी : प्रतिनिधी
महाभारतकालीन हरवलेला खजिना आणि आधुनिक काळातील त्याचा शोध, असे रंजक कथानक ‘विश्वस्त' कादंबरीमध्ये मांडले आहे. हा कादंबरीचा वन लायनर म्हणता येईल. हरवलेल्या खजिन्याचा शोध एवढ्या पुरतीच ‘विश्वस्त' मर्यादित नाही. ऐतिहासिक रहस्यांचा मागोवा घेण्याचा छंद लागलेल्या पाच जणांच्या ग्रुपने घेतलेला हा शोध आहे, असा उलगडा ‘विश्वस्त' कादंबरीचे लेखक वसंत लिमये यांनी केला.
सम्राट क्लब पर्वरी आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘लेखक तुमच्या भेटीला' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी लेखक वसंत लिमये यांची त्यांच्या ‘विश्वस्त' या कादंबरीवर व त्याच्या वाटचालीवर आधारित प्रवीण सबनीस यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते. लिमये पुढे म्हणाले, कादंबरीत वाचकाला महाभारतकालीन श्रीकृष्ण, द्वारका, उद्धव या व्यक्तिरेखा विशिष्ट संदर्भात भेटतात. तशाच ख्रिस्तपूर्व काळातील चाणक्य, विष्णुगुप्त, चंद्रगुप्त, पाटलीपुत्र हेही भेटतात. शिवाय ख्रिस्ताब्द १०२६ मधील सोमनाथची लूट करणारा गझनीचा महमद आणि वजीर कासम हेही भेटतात. वरवर पाहता हे काळ वाचकाला संभ्रमात पाडू शकतात; पण ते जोडण्याचे काम उपरोक्त पाच जणांच्या ग्रुपला नाशिकजवळ सापडलेले ताम्रपट करतात. एका ताम्रपटावर श्रीकृष्णाने रचलेले पाच श्लोक, तर दुसऱ्या ताम्रपटावर चाणक्याने रचलेले चार श्लोक आढळतात. या ताम्रपटांच्या आधारे या ग्रुपची शोधमोहीम सुरू होते. तिला मी ‘ऑपरेशन गोल्डन गेट' म्हटले आहे. या शोध प्रवासात ग्रुपला खलनायकी प्रवृत्तीच्या गटांशी आणि त्यांच्या कृष्णकृत्यांशी सामना करावा लागतो. अमेरिकेतील बलाढ्य तेल कंपनीच्या एन्ट्रीमुळे या शोधाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे संदर्भ मिळतात. कादंबरीचा शेवट एका अकल्पनीय बिंदूपाशी थांबतो. विश्वस्त आणि वारसदार यांना एकाच वेळी कवेत घेणारी ही कादंबरी एक शोधयात्रा असून एकूण ३२ प्रकरणे आणि ५४० पृष्ठे इतका तिचा विस्तार आहे.
शोध घेणे मला आवडते. मला फोटोग्राफीचा छंद आहे. मी मूळचा आयआयटीचा विद्यार्थी आहे. अभियांत्रिकीची पार्श्वभूमी आहे. व्यावसायिक कारणांनी आणि आवडीपोटी जगभर सतत भटकंती सुरू असते. विविध क्षेत्रांतली माणसे भेटत असतात. इतिहास, प्रागैतिहास, आपल्या प्राचीन परंपरा, तत्त्वज्ञानाचा वारसा, पूर्वसुरींनी उभारलेले ज्ञानभांडार यांची मला जाणीव आहे.त्यामुळे माझ्या कुवतीनुसार त्यातही मुशाफिरी सुरू असते. समकालीन वास्तवाचे प्रवाह येऊन मिळतात. त्यांचे धागे मी लेखक म्हणून जुळवत जातो, असेही लिमये यांनी सांगितले.