श्रीलंकेचा पाकिस्तानविरुद्ध २-०ने मालिका विजय

10th October 2017, 07:51 Hrs
दुबई :
ऑफ स्पिनर दिलरुवान परेराच्या नेतृत्वात गोलंदाजांच्या उत्कृष्ट प्रदर्शनाच्या जोरावर श्रीलंकाने असद शाफिकच्या शतकानंतरही पाकिस्तानचा दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पराभव करत त्यांना ६८ धावांनी पराभूत केले. ही मालिका लंकेने २-०ने आपल्या नावावर केली.
आपल्या ‘दुसऱ्या घरी' म्हणजे सौदी अरेबियात मालिका गमावण्याची पाकिस्तानवर वेळ आली आहे. २००९मध्ये लंकंन संघावर झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान घरचे सामने दुबईच्या मैदानावर खेळत आहे.
शाफिक (११२) आणि कर्णधार सरफराज अहमदने (६८) १७३ धावा काढत पाकिस्तानच्या आशा जिवंत ठेवल्या मात्र ही भागीदारी तुटताच पाकिस्ताचा डाव लवकर संपुष्टात आला. ३१७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना या दिवस - रात्रीच्या कसोटी सामन्याच्या पाचव्या व अंतिम दिवशी पहिल्या सत्रात पाकिस्तान २४८ धावांत आटोपला. परेराच्या (९८ धावांत ५ बळी) चांगल्या गोलंदाजीमुळे चौथ्या दिवशी पाकिस्तानने ५२ धावांवर पाच गडी गमावले होते मात्र यानंतर शाफिक आणि सरफराजने केवळ गडी बाद होण्याचा क्रम थांबला नाही तर आपल्या संघाला विजयाच्या जवळ नेऊन पोहोचवले.
या दोघांच्या प्रयत्नामुळे पाकिस्तानने आपली धावसंख्या ५ बाद १९८ धावांपर्यंत पोहोचवली. मत्र पाचव्या दिवशी परेराने सरफराजला जास्त वेळ टिकू दिले नाही. सरफराज बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानच्या फलंदाजांचा बाद होण्याचा क्रम सुरू झाला व पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे या सामन्यातही लवकर बाद होत सामना ६८ धावांनी लंकेच्या नावावर केला.
या विजयाबरोबरच लंकेचा संघ कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर पोहोचले तर पाकिस्तानला एका स्थानाचे नुकसान झाले असून ते आता सातव्या स्थानावर पोहोचले आहेत.