मटका प्रकरणी एसआयटीची अधिसूचना पुढील आठवड्यात

गोवा खंडपीठात सरकारची ​माहिती

04th October 2017, 05:22 Hrs

पणजी : प्रतिनिधी
मटका जुगार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. पी. लवंदे याच्या देखरेखीखाली विशेष तपास पथक स्थापन (एसआयटी) करण्याबाबत अधिसूचना पुढील आठवड्यात जारी होणार असल्याची माहिती सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिली. या बाबत पुढील सुनावणी मंगळवार, १० ऑक्टोबरपर्यंत तहकूब
केली आहे.
मटका जुगार प्रकरणी पथक स्थापन करण्यास वेळकाढू धोरण राबत असल्यामुळे आरटीआय कार्यकर्ता तथा वीज खात्याचे संयुक्त अभियंता काशिनाथ शेट्ये यांनी खंडपीठात अर्ज दाखल केले होते. या अर्जाच्या सुनावणी वेळी सरकारने संबंधित एसआयटी फाईल हातावेगळी केली आहे. पुढील काही दिवसांत अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याची माहिती सरकारतर्फे अॅडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांनी दिली. तसेच या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने विरोधी पक्षनेते तथा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांच्या घरावर मारलेल्या छाप्यात हजारो मटका चिठ्ठ्या, मटक्याच्या नोंदी असलेले रजिस्टर व इतर साहित्य आढळून आल्याची तसेच मटका प्रकरणी राज्यात मारलेल्या छापा बाबत माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे.
पोलिस खात्याने सरकारकडे पोलिस अधीक्षक बॉसुएट सिल्वा याच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक कृष्णा सिनारी, उपनिरीक्षक वामन नाईक आणि उपनिरीक्षक अक्षय गावकर तसेच दोन हवालदार आणि चार पोलिस कॉन्स्टेबलची नियुक्ती करून पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला होता. त्यावर सरकार निर्णय घेतला आहे.