बाबल कवळेकरांच्या आजच्या जबाबाकडे राज्याचे लक्ष

अटकपूर्व जामीन अर्जावरही आजच सुनावणी


25th September 2017, 03:32 am
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : गुन्हा अन्वेषण विभागाने छापा घातलेली बेतूल येथील आपल्या बंगल्याशेजारील खोली व त्यात सापडलेले मटका साहित्य आपले बंधू बाबल कवळेकर यांचे असल्याचा जो जबाब विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दिला आहे, त्या अनुषंगाने चौकशीसाठी सोमवारी बाबल कवळेकर गुन्हा अन्वेषण विभागासमोर हजर राहणार आहेत. बाबल कवळेकर नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बाबल कवळेकर यांना गुन्हा अन्वेषण विभागाने समन्स जारी केल्यानंतर त्यांनी मडगाव येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असून, त्यावर सोमवारीच सुनावणी होणार आहे. न्यायालयाकडून गुन्हा अन्वेषण विभागाला आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने बाबू कवळेकर यांच्या बंगल्याशेजारील एका कार्यालयावजा खोलीवर २० सप्टेंबर रोजी छापा टाकला होता. त्यात मटका चिठ्ठ्या, मटक्याच्या नोंदी असलेले रजिस्टर व मटका व्यवसायाशी संबंधित साहित्य सापडल्याचा दावा विभागाने केला आहे. मटका व्यवसायाची चौकशी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाअंतर्गत गुन्हा विभागाकडून सुरू आहे. या छाप्याच्या अनुषंगाने विभागाने बाबू कवळेकर यांना शुक्रवारी पाचारण करून त्यांचा जबाब नोंदविला होता. त्यावेळी बाबू कवळेकर यांनी ही खोली आपले बंधू बाबल कवळेकर यांची असल्याचे म्हटले होते. बाबू कवळेकर यांच्या जबाबावरून गुन्हा विभागाने बाबल कवळेकर यांना सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स जारी केले आहेत.
बाबल यांच्या जबाबानंतरच ठरणार तपासाची दिशा
सोमवारच्या चौकशीवेळी बाबल कवळेकर नेमका काय पवित्रा घेतात, त्यावरून बाबू कवळेकर यांच्या जबाबातील तथ्य समोर येणार आहे.
बाबल कवळेकर यांनी या समन्समुळे अटकेची शक्यता ओळखून ताबडतोब मडगाव सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
गुन्हा अन्वेषण विभाग सत्र न्यायालयासमोर त्यांच्या समन्सप्रकरणी काय भूमिका मांडतो आणि बाबल कवळेकर आपल्या जबाबात विभागाला काय सांगतात, यावरून या प्रकरणाच्या तपासाची पुढील दिशा निश्चित होणार आहे.