सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गडेकरला कारावास


25th September 2017, 06:30 am
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे पर्रा- म्हापसा येथील कथित आरटीआय कार्यकर्ता दीपक गडेकर याला पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश शिल्पा पंडित यांनी २ महिन्याचा कारावास आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडातील रक्कम ५ हजार रुपये तक्रारदार वाहतूक खात्याचे निरीक्षक रवींद्र सातार्डेकर यांना देण्यास सांगितले.
वाहतूक खात्याचे निरीक्षक सातार्डेकर २ सप्टेंबर २०१२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजता सहाय्यक मनोज सावंत यांच्यासह सेवा बजावत असताना संशयित गडेकर यांच्या नेतृत्वाखाली दोन व्यक्तींनी चेक पोस्टमध्ये प्रवेश केला. त्यांनी कार्यालयाबाहेरील वाहनांविषयी सातार्डेकरांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यावेळी गडेकर यांनी कॅमेऱ्याद्वारे परिसरात शूट करण्यास सुरुवात केली. त्यावेळी गडेकरने स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष असल्याचे सांगून अन्य ओळख उघड करण्यास नकार दिला. या प्रकरणी कर्मचाऱ्यांना धमकी देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार सातार्डेकर यांनी पेडणे पोलिस स्थानकात दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार केशव नाईक यांनी संशयित दीपक गडेकर याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४४८, ३५३ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करून तपास केला. त्यानंतर पोलिसांनी २७ ऑगस्ट २०१३ रोजी पेडणे येथील प्रथमवर्ग न्यायालयात संशयिताविरोधात आरोपपत्र दाखल केले. न्यायालयाने संशयितांवर आरोप सिद्ध करून खटला सुरू करून संशयित गडेकरला शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयात संशयितातर्फे अॅड. पी. नाईक यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी वकील एस. मांद्रेकर यांनी न्यायालयात बाजू मांडली.