नितीश बेलुरकरला अखिल गोवा बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद


25th September 2017, 03:06 am
पणजी : फिडे मास्टर नितीश बेलुरकरने श्रीम. कांचनी प्रभुदेसाई स्मृती द्वितीय अखिल गोवा खुल्या फिडे जलद मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचे आयोजन बाणावली चेस क्लब आणि युनिक चेस अकादमी कुडचडेने दामोदर विद्या भुवन, कोंब - मडगाव येथे केले होते.
जिनो फार्मास्युटिकल्सचा ब्रँड अँबेसिडर असलेल्या ​नितीशने ९ फेऱ्यांनंतर अपराजित राहत ८.५ गुणांची कमाई केल. विजेत्या खेळाडूला १० हजार रुपये आणि फिरता चषक प्रदान करण्यात आला. सातव्या फेरीत नितीशने नीरज सारिपल्लीविरुद्ध डाव बरोबरीत सोडवला तर अंतिम फेरीत त्याने गुंजल चोपडेकरचा पराभव करत अजिंक्यपद
पटकावले.
स्विस लीग पद्धतीने खेळवण्यात आलेल्या या स्पर्धेला गोवा चेस असोसिएशनची व ऑल इंडिया चेस फेडरेशनची मान्यता मिळाली आहे. स्पर्धेत अमेय औदीने आर्यन रायकरचा पराभव करत द्वितीय स्थान पटकावले. त्याने ८ गुणांची कमाई केली. तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात नीरज सारिपल्लीने माधवन जीचा पराभव करत ७.५ गुण मिळवत तिसरे स्थान ​मिळवले. पहिल्या २० खेळाडूंना बक्षिसे प्रदान करण्यात आली.
विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे एआयसीएफचे खजिनदार व गोवा चेस असोसिएशनचे सचिव किशोर बांदेकर यांच्या हस्ते व बाणावली चेस क्लबचे अध्यक्ष वल्लभ देसाई, मुख्य आर्बिटर आशिष केणी, कन्वेयर संजय कवळेकर, बाणावली चेस क्लबचे सचिव ​विजयकुमार तारी, एसटीसीएचे सचिव दामोदर जांबावलीकर, बाणावली चेस क्लबचे उपाध्यक्ष स्वप्नी होबळे व आर्बिटर गौतम तारी यांच्या उप​स्थितीत बक्षिसे प्रदान करण्यात आली.