यापुढे विकासरूपी बदलासाठी प्रयत्नशील : पालयेकर

 ओशेल पंचारतीमधील ‘संडे डायलॉग' कार्यक्रमात प्रतिपादन


25th September 2017, 03:00 am
यापुढे विकासरूपी बदलासाठी प्रयत्नशील : पालयेकर
प्रतिनिधी
गोवन वार्ता
शिवोली : ओशेल पंचायतीमध्ये यापूर्वी सर्वसमावेशक विकास करण्याचा प्रयत्न झालेलाच नाही. एकमेकाचा बदला घेण्याचाच प्रयत्न झाला. मात्र, यापुढे बदला घेण्याचा नव्हे तर विकासरूपी बदल घडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिवोली आमदार व जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यानी दिले.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्यासाठी ओशेल पंचायतीच्या सभागृहात संडे डायलॉगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालयेकर यानी ओशेल गावच्या विकासासाठी सर्वप्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. सरकार लोकांच्या दारात आणायचा संडे डायलॉगचा उद्देश आहे. सरकार व लोकांमधील दरी कमी करण्यासाठी व लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पालयेकर म्हणाले.
यावेळी ऐन चतुर्थीच्या काळात पाणी समस्या होती. याबाबत अधिकाऱ्यांना कळवूनही उपाययोजना न झाल्याचा दावा अजित ताम्हणकर यांनी केला. भाटी परिसरात अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. यावर कारवाईची मागणी करण्यात आली. याबाबत लेखी तक्रार देण्याची सूचना सरपंच रेषल आरपोरकर यांनी केली.
पंचायत क्षेत्रातील कचरा समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी प्रीतेश गारुडी यांनी केली. गावातील कचरा समस्या सोडविण्यासाठी ठिकठिकाणी कचरापेटी ठेवण्यात येतील. नागरिकांनी योग्य जागा सुचविण्याचे आवाहन सरपंचांनी केले. खासदार निधीतून प्रत्येक पंचायतीला लहान गाडी दिली जाणार असून त्यातून गावातील कचरा साळगाव कचरा प्रकल्पाकडे नेण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दुर्गादास कामत यानी दिली.
शिवोलीत भूमिगत वीज वाहिन्या टाकण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी शिवोलीतील या कामासाठी अनुकूलता दाखविल्याचे कामत यानी स्पष्ट केले. भाटी येथे मच्छीमार शेड मोडून व्यायामशाळा बांधण्यात येईल. या ठिकाणी बांधावर विजेची सोय करून अनैतिक व्यवसायांना आळा घालणार असल्याचे मंत्री पालयेकर यांनी स्पष्ट केले. भाटी परिसरातील कामांत सरकार समर्थक व विरोधक असा भेदभाव केला जाऊ नये, अशी मागणी करण्यात आली. यापुढे ग्रामस्थांना सोबत घेऊनच विकास केला जाणार असल्याचे आश्वासन पालयेकर यानी दिले. यावेळी उपसरपंच सुरथ वेर्णेकर, पंच वंदना नार्वेकर, महादेव हरमलकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक धारगळकर व विविध विभागाचे अभियंता उपस्थित होते.