चोपडे पूल - सर्कल रस्त्याची चाळण

 आमदार दयानंद सोपटे यांनी लक्ष देऊन हॉटमिक्स डांबरीकरण करण्याची मागणी


25th September 2017, 03:58 am
चोपडे पूल - सर्कल रस्त्याची चाळण
प्रतिनिधी
गोवन वार्ता
पेडणे : चाेपडे पूल ते सर्कल या दरम्यानच्या रस्त्याची​ चाळण झाली आहे. त्यामुळे येथील सर्कलच्या सुशोभिकरणाला बाधा येत आहे. याची आमदार दयानंद सोपटे यांनी दखल घेऊन रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहन चालक व नागरिकांतून केली
जात आहे.
पर्यटन खात्याने स्वदेशी योजने अंतर्गत आणि तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मांद्रे मतदारसंघाचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या चोपडे पूल ते चोपडे सर्कल पर्यंतच्या परिसराचे पावणे सहाकोटी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले होते. परंतु ठेकेदाराने चोपडे पूल ते सर्कल पर्यंतच्या रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकारण न केल्याने सध्या या रास्त्याची चाळण झाली. त्यामुळे येथील सुशोभिकरण केलेल्या सर्कलला या रस्त्यामुळे बाधा येत आहे.
१५ वर्षांपूर्वी चोपडे शिवोली पुलाचे उद्घाटन ४ जुलै २००२ मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चोपडे शिवोली पुलावरून विकास मांद्रे मतदार संघाचा होईल, असे म्हटले होते. त्याप्रमाणे पूल झाल्यानंतर मांद्रे मतदारसंघाच्या विकासाला गती मिळाली.
सध्या या भागाच्या विचार करता ग्रामीण भागाने कात टाकून शहरीकरणाचा वेध घेतलेला आहे. मात्र साधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून सहकार्य मिळणे आवश्यक आहे. यासाठी मांद्रे मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार दयानंद सोपटे प्रयत्नशील आहेत.
शिवोली चोपडे पुलावरून प्रवेश केल्यानंतर सुशोभिकरण केलेल्या चोपडे सर्कल पर्यंतच्या रस्त्याची झालेली चाळण झाल्याने रस्त्यावरून वाहने चालवणे म्हणजे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. या भागाचे आमदार दयानंद सोपटे यांच्याकडे याबाबत संपर्क साधला असता, चोपडे पूल ते सर्कल रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांत नाराजी आहे, हे सत्य आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. मांद्रे मतदारसंघ हा पर्यटन दृष्ट्या फार महत्त्वाचा अाहे. त्यामुळे मांद्रे मतदारसंघाच्या प्रवेशद्वारावर रस्त्याची बनलेली स्थिती पाहता येथील सौदर्याला बाधा आणणारी आहे.
या अर्धवट कामाचा पाठपुरावा करून रस्त्याच्या हॉटमिक्सिंगबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी मुख्यमंत्री सहकार्य देणार असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला.