आचारसंहितेने रखडणाऱ्या कामावर उपाय हवा

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मत : गोवा छाया पत्रकार संघटनेचा वर्धापन दिन साजरा


25th September 2017, 01:31 am
आचारसंहितेने रखडणाऱ्या कामावर उपाय हवाप्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : आचारसंहितेचे उद्दिष्ट महत्त्वाचे कार्यक्रम प्रलंबित ठेवणे नसले तरी निवडणूक आचारसंहितेमुळे कित्येक महत्त्वाचे कार्यक्रम आणि सरकारी कामे रखडत आहेत. त्यामुळे यावर काही पर्याय काढण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
गोवा छाया पत्रकार संघटना यांच्या १० व्या वर्धापन दिनी गोवा माहिती व प्रसिद्धी खाते, कला व संस्कृती खाते यांच्या सहकार्याने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक टी. एस. सावंत, अशोक परब, छाया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष गणेश शेटकर, सरचिटणीस विपूल रेगे उपस्थित होते.
मुख्यमंत्री पर्रीकर पुढे म्हणाले की, वृत्तपत्रातील बातम्यांना प्रखरपणे मांडण्यात छायाचित्रांचा मोठा वाटा असतो. छायाचित्रातून बातमी किती प्रभावी आहे हे दिसून येते. कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे म्हणाले की, याेग्य वेळी योग्य मुद्रा कॅमेऱ्यात कैद करणे हे छाया पत्रकारांचे कौशल्य आहे. माणसाच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका छायाचित्रकार करीत असतात.
यावेळी छायाचित्र क्षेत्रात चांगली कामगिरी केलेल्या छाया पत्रकार उमेश बाणास्तरकर व चंद्रकांत नारुलकर यांचा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
छायाचित्र
स्पर्धेतील विजेते
छाया पत्रकार संघटनेने आयोजित केलेल्या खुल्या गटातील छायाचित्र स्पर्धेत प्रथम बक्षीस अंजुना येथील भारती नाईक, व्दितीय बक्षीस खांडोळा मार्शेल येथील वैभव भगत, तृतीय बक्षीस वारखंडे-फोंडा येथील यतीश देविदास यांना प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षीस मिरामार-पणजी येथील मनीष चोपडेकर, फोंडा येथील केदार मराठे, सांताक्रुझ येथील वैभव सावंत यांना मिळाले. शाळा पातळीवर प्रथम बक्षीस बालभारती विद्या मंदिर रायबंदर शाळेचे अक्षय नाईक, व्दितीय बक्षीस शाल्मली सावंत (डॉ. के.बी.हेगडेवार हायस्कूल, कुजिरा, बांबोळी), तृतीय बक्षीस प्रणिता ओटवणेकर (पीपल्स हायस्कूल, मळा), उत्तेजनार्थ बक्षीस अविला काणे (फैरीलॅन्ड हायस्कूल, गोवा वेल्हा), अनिशा बोरकर ((फैरीलॅन्ड हायस्कूल), शेखर गावकर (सरकारी माध्यमिक शाळा, नगरगाव वाळपई) यांना प्राप्त झाले. स्पर्धेचे परीक्षण सेबी रॉड्रिग्ज,नागेश सरदेसाई, ई. रोझारियो यांनी केले.