जपान ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात


23rd September 2017, 08:01 pm
जपान ओपनमध्ये भारताचे आव्हान संपुष्टातटोकियो : प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डीला मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत संघर्षपूर्ण सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाबरोबरच भारताचे जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आले.
यावर्षी लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड किताब जिंकणारे प्रणव आणि सिक्की पहिला गेम जिंकल्यानंतरही स्थानिक खेळाडू ताकुरो होकी आणि सयाका हिरोताकडून २१-१४, १५-२१, १९-२१ने पराभवाचा सामना करावा लागला.
भारतीय जोडीने ६० मिनिटांपर्यंत झालेल्या सामन्यात पहिल्या गेममध्ये ७-४ने आघाडी मिळवली मात्र जपानी जोडीने ९-९ने बरोबरी साधली. मात्र यानंतर पुन्हा प्रणव आणि सिक्कीच्या जोडीने आघाडी मिळवली आणि पहिला गेम आपल्या नावावर केला.
ताकुरो आणि सयाकाने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन केले व ४-१ने आघाडी मिळवली. यजमान संघाची जोडी ब्रेकपर्यंत ११-८ने आघाडीवर होती. प्रणव आणि सिक्कीने स्कोअर १३-१५ केला मात्र स्थानिक जोडीने शानदार प्रदर्शन करताना गेम १-१ने बरोबरीत आणला.

निर्णायक गेममध्ये संघर्षपूर्ण सामना पहायला मिळाला. दोन्ही जोडी ८-८ने बरोबरीवर होती मात्र जपानच्या जोडीने १३-९ने आघाडी ​मिळवली. दोन्ही जोडीमध्ये जबरदस्त सामना पाहण्यास मिळाला परंतु ताकुरो आणि सयाकाने २०-१९च्या स्कोअरवर मॅच पॉईंट मिळवला व पुढचा गुण मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले.