धारगळ परिसरात वृक्षतोड

 खैरीच्या लाकडाची बेकायदा वाहतूक करणारे वाहन जप्त; तुये वनखात्याची कारवाई


14th September 2017, 03:35 am
धारगळ परिसरात वृक्षतोडप्रतिनिधी
गोवन वार्ता
पेडणे : तुये येथील वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी खैरीची लाकडे महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे घेऊन जाणारे वाहन क्रमांक एमएच ०७ पी ३१९४ धारगळ सुकेकुरण येथे पकडले. या खैरीच्या लाकडाची किंमत ४० हजार रुपये आहे.
तुये वनाधिकारी विलास गावस यांनी दिलेल्या माहितीनुसार, धारगळ परिसरात खैरीची लाकडे तोडण्यात येत असून त्यांची वाहतूक बाहेरील राज्यात होत असल्याची कुणकुण वनविभागाला लागली होती. जंगल परिसरात ही वृक्षतोड गेल्या २० दिवसांपासून होत होती. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जंगल परिसरात रात्रंदिवस पाळत ठेवली. बुधवार दि. १३ रोजी पहाटेच्या सुमारास धारगळ सुकेकुळण येथे जंगल परिसरातून रस्त्यावर येताना एक वाहन सापडले. वन अधिकाऱ्यांनी हे वाहन ताब्यात घेऊन जप्त केले व तळेवाडी, सावंतवाडी येथील वाहनचालक महादेव परब, वाहनमालक मंगेश राऊत आणि लाकडे घेणारा विजय शिरोडकर या तिघा संशयितांना ताब्यात घेतले .
ही कारवाई अधिकारी विलास गावस यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव नाईक, गोपीनाथ भोसले, शैलेश गवंडी, जितेंद्र नाईक, सिद्धेश गावस, रवी पार्सेकर, कृष्णा गावस, गजानन शेटगावकर, शांभा गावस, नितेश शेट्ये व विठ्ठल प्रभू आदी अधिकाऱ्यांनी केली. अधिकाऱ्यांना माहिती देताना धारगळ येथील देसाई नामक व्यक्तीकडून खैरीची झाडे विकत घेतल्याचे संशयितांनी सांगितले. वन अधिकारी विलास गावस यांनी सांगितले की, वाहनमालकास पंचवीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. कागदपत्रे दाखवल्यानंतर व लाकडाची पूर्ण माहिती दिल्यानंतर १५ दिवसांनी वाहन सोडण्याची तरतूद कायद्यात आहे, असेही ते म्हणाले.
सुमारे १५ दिवसांपूर्वी धारगळ येथील एका नागरिकाने वन खात्याकडे आपल्या डोंगरभागातील खैरीची झाडे कुणीतरी तोडून नेली असल्याचे सांगितल्याने. खैरीची बेकायदा वृक्षतोड होत असल्याच्या संशयाला पुष्टी मिळाली. खैरीची झाडे तोडून परस्पर बाहेरील राज्यात नेली जात असल्याचा संशय बळावला आणि तुये वनखात्याने कडक पावले उचलत चोरटी वाहतूक करणारे वाहन दि. १३ रोजी पकडले.
ज्या वाहनातून लाकडे नेली जात होती त्या वाहनमालाकाला कोणत्या प्रकारचे भाडे आहे हे सांगितले गेले नव्हते. त्यामुळे वनखात्याने पकडलेले वाहन सोडवून घेण्यासाठी सकाळपासून वाहनमालक मंगेश राऊत यांची धावपळ सुरू होती. बेकायदा वाहतूक केल्याप्रकरणी तिघाजणांना अटक झाली आणि हमीपत्र दिल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत वाहन वनखात्याच्या ताब्यात असणार आहे.