माध्यम समितीला हवी ४५ दिवसांची मुदतवाढ


14th September 2017, 03:45 am

विशेष प्रतिनिधी
गोवन वार्ता
पणजी : माध्यम सल्लागार समितीचे काम अजूनही पूर्ण न झाल्यामुळे समितीने आणखी ४५ दिवसांची मुदतवाढ मागितली आहे. सरकार किमान ३० दिवस मुदतवाढ देईल, अशी समितीला अपेक्षा आहे.
समितीला दिलेली मुदतवाढ १० सप्टेंबर रोजी संपुष्टात आली. मात्र, पोटनिवडणुकीची आचारसंहिता आणि गणेश चतुर्थी यात पूर्वीची मुदतवाढ गेल्यामुळे समितीचे काम अजूनही प्रलंबित आहे. फक्त दोन सार्वजनिक सुनावण्या घेण्याचे बाकी आहे. त्यानंतर अहवाल तयार करण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे समितीने ४५ दिवसांची मुदतवाढ मागण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. गेल्या वर्षी स्थापन केलेल्या माध्यम समितीचे काम सुमारे चार महिने निवडणूक आचारसंहितेत अडकून पडले. त्याशिवाय दिवाळी, नाताळ, परीक्षा आणि वार्षिक सुट्टी यातही अडीच महिन्यांचा कालावधी गेला.
प्राचार्य भास्कर नायक यांच्या अध्यक्षतेखाली १७ सदस्यीय समिती गेल्या वर्षी जुलै महिन्यात स्थापन केली होती. प्राथमिक शिक्षणाचे माध्यम काय असावे यासह प्राथमिक स्तरावर शैक्षणिक क्षेत्रात करायचे बदल याविषयी समिती सरकारला अहवाल देणार आहे. समितीने ४५ दिवसांचा कालावधी मागण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. ही मुदतवाढ मिळाल्यास ऑक्टोबरच्या शेवटी समिती अहवाल सरकारला सादर करू शकते.