पालयेकरांना योग्य ते संरक्षण देऊ : मुख्यमंत्री

 कुठ्ठाळी येथील मार्केट प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी


14th September 2017, 02:42 am
पालयेकरांना योग्य ते संरक्षण देऊ : मुख्यमंत्री

प्रतिनिधी
गोवन वार्ता
वास्को : जलस्रोत खात्याचे मंत्री विनोद पालयेकर यांनी स्वतःच्या जीवाला धोका असल्याचे जे विधान केले आहे, त्यासंबंधी गोवा पोलिस योग्य तपास करीत आहेत. या तपासअंती योग्य माहिती बाहेर येईल. पालयेकर यांच्या सुरक्षेसंबंधी योग्यती खबरदारी घेण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी बुधवारी कुठ्ठाळी येथे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री पर्रीकर हे कुठ्ठाळी येथे गोवा साधन सुविधा महामंडळातर्फे बांधण्यात येणाऱ्या मार्केट प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आले असता पत्रकारांनी त्यांना पालयेकर यांच्या विधानासंबंधी प्रश्न केले. मंत्री पालयेकर यांनी केलेल्या विधानामुळे पोलिस सतर्क झाले आहेत. तसेच पालयेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी स्पष्ट केले.
कुठ्ठाळीच्या मार्केट प्रकल्पाची पाहणी करताना मुख्यमंत्री पर्रीकर यांच्यासमावेत कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा, कुठ्ठाळीच्या सरपंच सिंथिया परेरा, उपसरपंच रेमंड डिसा, पंच अनिता केंकरे, सांतान दगामा, एडोसियन रॉड्रिग्ज, केळशीच्या सरपंच मारिया परेरा, पंच सिंथिया डिसिल्वा होते. या मार्केट प्रकल्पात विक्रेत्यांची योग्य सोय करण्यात येणार आहे. तसेच सरकारी कार्यालये हलविण्यात येणार आहेत.
पूर्वीच्या कंत्राटदाराने काम सोडल्याने या प्रकल्पाचे काम रखडले होते. नवीन कंत्राटदाराने बांधकामाला वेग दिला असून आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. येत्या नोव्हेंबरपर्यंत मार्केटचे काम पूर्ण होईल.
- मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री