मडगावात बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्याला अटक


12th September 2017, 04:20 am
मडगावात बनावट प्रमाणपत्रे देणाऱ्याला अटक
प्रतिनिधी
गोवन वार्ता
मडगाव : इंडियन एज्युकेशन अकादमीतर्फे शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकारच्या बनावट शैक्षणिक पदवी, पदविका व उत्तीर्ण झाल्याची प्रमाणपत्रे देणाऱ्या निझाम बेग (४०) याला शहर पोलिसांनी त्याच्या कार्यालयात छापा मारून अटक केली. तसेच स्टँप, संगणक व प्रमाणपत्रांची कागदपत्रे जप्त केली आहे.
मडगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सी.एल. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार माडेल येथील सोझा निवासी संकुलातील एका फ्लॅट मध्ये बनावट शैक्षणिक पदवी, पदवीका अन्य प्रकारची प्रमाणपत्रे लाखो रुपये घेऊन दिली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यासह कार्यालयावर पाळत ठेवली होती. शहर पोलिसांनी माडेल भागात सापळा रचून छापा मारून ही कारवाई केली.
पोलिसांनी ज्यावेळी बेग याच्या कार्यालयावर छापा मारला, त्यावेळी एक दहावी उत्तीर्ण झालेले एक युवक ऑटोमोबाईल अभियंत्याची पदवी घेण्यासाठी त्यांच्याकडे आला होता. निझाम बेग यानी त्याला ऑटोमोबाईल अभियंत्याची पदवी देण्याचे मान्य केले होते. त्याबदल्यात त्याच्याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. दहावी उत्तीर्ण झालेल्या त्या युवकाने पदवी मिळविण्यासाठी आगाऊ रक्कम म्हणून ५० हजार रुपये दिले होते. पदवी हातात पडल्यानंतर उर्वरित एक लाख रुपये देण्याचा करार त्याच्याकडे करण्यात आला होता. पोलिसांनी वेळीच छापा मारल्याने बेग याचे बनावट शैक्षणिक पदवी देण्याचे भिंग
फुटले.
याविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार निझाम बेग हा आके येथील रहिवाशी असून गेल्या अनेक वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रातील विविध शाखांच्या बनावट पदवी गरजू युवकांना देऊन वर्षाकाठी लाखो रुपयांची कमाई करीत असे. २०१३ साली पणजीच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी एकवेळा त्याच्या कार्यालयावर अशाच प्रकारे छापा मारून त्याला अटक केली होती. त्यानंतर वर्षभर त्याने बनावट पदवी देण्याचा धंदा तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवला होता. अलीकडच्या काळात पुन्हा सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.सं.च्या ४६८, ४७२, ४७४ व ४२० कलमान्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास चालू आहे.