हरमनप्रीत कौरची पदोन्नती

रेल्वेत विशेष सेवा अधिकारी म्हणून स्वीकारणार कार्यभार


09th September 2017, 08:48 pm
हरमनप्रीत कौरची पदोन्नतीमुंबई : आयसीसीच्या महिला विश्व चषकात शानदार प्रदर्शन करणारी भारताची धडाकेबाज फलंदाज हरमनप्रीत कौरला पश्चिम रेल्वेने पदोन्नती करत विशेष सेवा अधिकारी (ओएसडी) म्हणून नेमले आहे. हरमनप्रीत मे २०१४ साली मुंबईत पश्चिम रेल्वेमध्ये मुख्य कार्यालय अधीक्षक म्हणून काम करत होती व आता तिला पदान्नती देऊन ओएसडी - क्रीडा बनवण्यात आले आहे.
पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ प्रवक्त्याने सांगितले, आयसीसी महिला विश्व चषकात तिचे जबरदस्त प्रदर्शन पाहता रेल्वे मंत्रालयाने हरमनप्रीतला वेळेआधीच पदोन्नती देत रेल्वेत ग्रुप ‘बी'मध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवडण्यात आले आहे. त्यांनी पुढे सांगितले, रेल्वेशी निगडित जो खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर शानदार प्रदर्शन करतो त्याला रेल्वे सन्मान आणि पदोन्नती देते. हरमनप्रीतला ही पदाेन्नती ७ सप्टेंबर रोजी देण्यात आली होती.
मोठे फटके लगावण्यात तरबेज असणाऱ्या हरमनप्रीतने २००९ साली पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. विश्व चषकाच्या उपांत्य फेरीत हरमनप्रीतने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ११५ चेंडूत १७१ धावांची तुफानी खेळी करत भारताला अंतिम फेरीत पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका उचलली होती. मात्र अंतिम फेरीत भारताला इंग्लंडकडून थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला होता. संघाच्या या प्रदर्शनामुळे तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेशी संलग्न असणाऱ्या १० खेळाडूंना १.३० कोटी रुपये रोख देत सर्वांना पदोन्नती देण्याची घोषणा केली होती.