शाहरूखच्या संघात पाकिस्तानी खेळाडू


09th September 2017, 06:06 pm
शाहरूखच्या संघात पाकिस्तानी खेळाडूलहोर : भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट संघ आपापसात द्विपक्षीय मालिका खेळताना दिसत नाहीत किंवा आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंना स्थान मिळत नाही आहे. याचे कारण आहे दोन्ही देशांमधील तणाव. मात्र यानंतरही बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानने आपल्या संघात एका पाकिस्तानी खेळाडूला स्थान दिले आहे.
शाहरूख खानने या पाकिस्तानी खेळाडूला इंडियन प्रीमियर लीगसाठी नव्हे तर कॅरेबियन प्रीमियर लीगसाठी (सीपीएल) करारबद्ध केले आहे. शाहरूख खानने सीपीएलमध्येही एक संघ घेतलेला आहे. व त्याच्या संघाचे नाव त्रिनबागो नाईट रायडर्स असे आहे.
पाकिस्तानचा लेग स्पिनर यासिर शाह कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. सीपीएलचा संघ त्रिनबागोसोबत यासिरने करार केला आहे. यासिर दुसऱ्यांदा एखाद्या विदेशी टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो २०१५मध्ये बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळला आहे.
यासिर आपल्याच देशातील शादाब खानची जागा घेणार. शादाब विश्व एकादशविरुद्ध होणाऱ्या टी-२० सामन्यासाठी पाकिस्तानात परतला आहे. नाईट रायर्डचे प्रशिक्षक सायमन कॅटीज यांनी सांगितले, टी-२० क्रिकेटमध्ये विजय मिळवण्यासाठी गडी बाद करणे गरजेचे आहे व यासिर हे करू शकतो. आम्ही स्पर्धेच्या शेवटाकडे पोहोचलो आहोत व यासिर आम्हाला आमचा दुसरा सीपीएल किताब मिळवून देण्यात मदत करू शकतो.