भिंतीवरी कॅलेंडर असावे

टीपकागद

Story: प्रतिभा कारंजकर |
18th January 2020, 11:39 am


-
नवीन वर्षाची सुरवात म्हणजे डायर्‍या, पेन, कॅलेंडर यांच्या भेटी देण्याघेण्याचा काळ. हल्ली मोबाईलमुळे जरी काही गोष्टींचा वापर कमी झाला असला तरी काही गोष्टी आपलं स्थान अजूनही टिकवून आहेत. त्यातलीच एक म्हणजे कॅलेंडर किंवा कालमापन दिनदर्शिका. बरेच वर्षांपासून अंगवळणी पडलेली सवय जास्त सोयीची वाटते तसंच काहीसं या कॅलेंडरचं. निदान मला तरी तसं वाटतं.
रोज सकाळी उठल्या उठल्या किचनमध्ये लावलेल्या कॅलेंडरवरुन एक नजर फिरवायची माझी सवय. त्या दिवसातल्या महत्त्वाच्या गोष्टी, तिथी, करायची कामे, बर्थडे, कार्यक्रम यांची उजळणी एका मिनिटात होते. या गोष्टींची नोंद मी कॅलेंडर आणलं की पेनाने खुणा करून किंवा लिहूनच ठेवते. गेल्या वर्षीच्या कॅलेंडरवरच्या नोंदी पाहून नवीन कॅलेंडरवर कॉपी केली की झाले. मोबाईलमध्ये नोंद ठेवली की नको तेव्हा परत परत त्याचे रिमाइंडर येत रहातं. खरं तर आपली स्मरणशक्ती मोबाईलमुळे कमी होत चाललीय, असं वाटतं.
कॅलेंडर हे त्या त्या दिवसाचे सामाजिक, धार्मिक, व्यावसायिक महत्व काय आहे, हेही दर्शवत असते. मग त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असेल किंवा दीपावलीच्या हे कळते. काही लोक अमावास्या, पौर्णिमा, संकष्टीला महत्व देतात. देश- विदेशातले कुठले दिवस आहेत, ते कळते. भारतीय पंचांगाप्रमाणे हिंदूंचा वर्ष आरंभ चैत्रात होतो तर इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे जानेवारीत, इस्लामी लोक मोहरम पासून नवे वर्ष मानतात. जैन दीपावलीच्या पहिल्या दिवशी वर्षाची सुरवात मानतात. पंजाबी बैसाखीपासून नवे वर्ष मानतात. पण, एकसूत्रता येण्यासाठी आपण सारे आता इंग्रजी कॅलेंडरचाच वापर करतो. ज्युलियस सीझरला पहिल्यांदा कॅलेंडरची कल्पना सुचली असे म्हणतात. तेव्हापासून देश विदेशात चंद्र व सूर्य यांच्या स्थितीनुसार कॅलेंडरची रचना केली जाऊ लागली. ती आजतागायत चालू आहे.
बऱ्याच वर्षांपूर्वी कॅलेंडरवरील तारखांची जागा लहान असायची आणि चित्रे मोठ्ठी. त्याचा उपयोग भिंतीची सजावट करण्यासाठी व्हायचा, तर कधी भिंतीवर पडलेली भोके लपवण्यासाठी. चित्रे आकर्षक असायची. जास्त करून पी. सरदार, मुळगावकर किंवा दलाल यांची. देवादिकांची, सिने नट्यांची, निसर्ग देखावे, वीर पुरुषांची, गोंडस बाळांची ती असत. काहींना देव्हार्‍यातही स्थान मिळे, काही देवळात भिंतींवर देवांच्या अनेक रुपांची, लीलांची चित्रे कॅलेंडरच्या स्वरुपात दिसायची. पण आता ती पद्धत बंद झालेली दिसते. दरवर्षी फार्मसी, दुकानातून, टेलरकडून अशी चित्ररूपी कॅलेंडरची भेट मिळायची. लोक ती कौतुकाने लावायचे सुद्धा. कधी हक्काने मागूनही घ्यायचे. आता काही बँका देतात पण त्यावर नुसतीच आकड्यांची गर्दी असते, सुट्ट्यांची लाल अक्षरे अन् कामाची निळी किंवा काळी. ती सजावटीसाठी नसतात.
पोरवाल नेत्रांजनचं कॅलेंडर सुंदर डोळ्यांची आई आणि बाळ यांचं असायचं तर, बिटको ग्राईप वॉटर, त्याच्यावरची गोंडस बाळे गरोदर बायका मुद्दाम नजरेस पडेल अशा रीतीने घरात लावायच्या, गणपती, लक्ष्मी, सरस्वती, मारुती अशी देवांची कॅलेंडर घराची शोभा वाढवायचे. घरातली देवभोळी व्यक्ती येता जाता त्या देवाच्या चित्राला हात जोडत. माझे मिस्टर सिबा कंपनीत असल्याने आमच्याकडे दरवर्षी स्वीत्झर्लंडची सीनसिनरी गुळगुळीत महागड्या पेपरवर छापलेली कॅलेंडरे मिळायची. त्यापूर्वी तर खूप मोठ्या आकाराचे, संपूर्ण पान राजा रविवर्मा याच्या देवतेच्या चित्राचे कॅलेंडर मिळायचे. जुनी झाली तरी या कॅलेंडरमधल्या चित्राची फ्रेम केली जायची. मुलांच्या वह्यांना त्या जाड, गुळगुळीत कागदाचे कव्हर घालता यायचे॰ महाराष्ट्रात एक विड्या बनवणारी कंपनी फार सुंदर चित्र असलेली मोठी कॅलेंडर भेट द्यायची. त्यावर एकदा एका बिड्या वळणार्‍या स्त्रीचे चित्र प्रसिद्ध झाले होते आणि तिने नेसलेल्या हिरव्या साडीला एकदम मागणी वाढली होती. आमच्या घरी तेव्हा लता मंगेशकर यांचे मोठ्ठे चित्र असलेले कॅलेंडर होते. पांढर्‍या शुभ्र साडीतली त्यांची प्रतिमा अजूनही नजरेसमोर येते ती त्या कॅलेंडरमध्ये पाहिली होती तशीच.
एका आदिवासी स्त्रीचे उभे असलेल्या पोज मध्ये एक कॅलेंडर तेव्हा खूप ठिकाणी दिसे. तर नेत्यांमध्ये जवाहर लाल नेहरूंचे कोटाच्या खिशावर लाल गुलाबाचे फूल असलेले कॅलेंडर असायचे. सलून तसेच पानाच्या ठेल्यावर कॅलेंडरची रेलचेल असायची. गुटगुटीत बाळांची कॅलेंडरही सर्रास पाहायला मिळायची त्यामुळे कॅलेंडर म्हणजे बाळ या अर्थानेही ‘कॅलेंडर’ हा शब्द प्रचलित झाला होता.
कॅलेंडर हे चित्रांसहितच असतं अशीच समज निर्माण झाली होती, पण आता ती समज फोल ठरत चाललीय. चित्रांशिवाय नुसत्या तारखांची कॅलेंडर बनू लागलीत, पण थोड्या दिवसांनी ती पण कालबाह्य होतील. कारण मोबाइलमध्ये इतकी नवनवी फंक्शन्स येताहेत की कॅलेंडर बघायला उठून जायची गरजच पडणार नाही. हातातला मोबाइल हवी ती माहिती क्षणार्धात देईल आणि कॅलेंडर सुद्धा आपली भिंतीवरची जागा सोडून त्या मोबाइलच्या छोट्याशा जागेत आपलं अंग आकसून आत जाऊन बसेल.

(लेखिका गृहिणी, साहित्यिक आहेत.)