स्वागत पहिल्या सणाचे...

नजरेतलं जग

Story: गौरी भालचंद्र |
18th January 2020, 11:38 am
स्वागत पहिल्या सणाचे...


---
नवीन वर्षाचा स्वागतोत्सव साजरा झाला की वर्षातल्या पहिल्या सणाचा आनंद लुटायला आपण सज्ज होतो. तो सण म्हणजे मकर संक्रांती. वातावरणात कमालीचा गारठा असतो तो मकरसंक्रात सणापूर्वी. प्रत्येकाला या थंडीची हुडहुडी बऱ्यापैकी जाणवत असते. मकरसंक्रांतीपासून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते. मकरसंक्रांतीला सुवासिनी एकमेकींना सुगडाचे वाण देतात. मकरसंक्रांतीला काळे कपडे घालण्याचीही पद्धत आहे. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला” असं आपण एकमेकांना आवर्जून म्हणत असतो त्यावेळी. गुळाची पोळी आणि तीळगुळ याचे या दिवशी विशेष महत्व असते. सुवासिनी या दिवसांमध्ये हळदीकुंकवाचे आयोजन करतात. तर अनेक ठिकाणी, खास करून गुजरातमध्ये पतंग महोत्सवदेखील आयोजित केले जातात.
कोणताही सण आनंद, उत्साह, नवचैतन्य देण्याकरताच येत असतो. दैनंदिन आयुष्यातल्या घडामोडींपासून चार क्षण निवांत काढून आपण या सणांचे स्वागत करतो. त्यात रममाण होतो, भेटीगाठी होतात आणि यापासून मिळालेली उर्जा तो आनंद पुढे कित्येक दिवस आपल्याला रोजच्या दिनक्रमात जगण्याकरता उपयोगाला येतो. आणि म्हणूनच आपण प्रत्येक सण उत्साहाने जगावयास हवा, असे मला आवर्जून वाटते. संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी. भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांती असते. भोगीच्या दिवशी तिळाची गरमागरम भाकरी, वांग्याचे भरीत आणि मिश्र भाजी करण्याची पद्धत आहे. या सणाच्या निमित्ताने बाजरीची भाकरी करून तिला तीळ चिकटवले जातात. लोणी, फुटाणे, गाजर, मुगाच्या डाळीची खिचडी केली जाते, घरोघरी तिळाचे लाडूही केले जातात. हल्ली तर बाजारभर तिळाच्या लाडवांची विविध आकारांची पाकिटे वाटेवाटेवर घेऊन बरेच जण बसलेले असतात.
हलव्याचे विविध प्रकारचे वैशिष्ट्यपूर्ण असे मनोवेधक दागिने, काळी साडी, खाण्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद, आप्तेष्टांच्या भेटीगाठी, हळदी कुंकवाच्या निमित्ताने शेजाऱ्यांची भेट, पतंगोत्सव असे कितीतरी छान अनुभव आपण या एका सणाच्या माध्यमातून घेत असतो. या दिवशी महिला एकत्र येऊन हळदीकुंकू समारंभ करतात. विविध वस्तूंचेही वाण या दिवसात लुटले जाते. संक्रातीच्या वेळी देण्यात येणारे वाणही वैविध्यपूर्ण असते. या दिवसात दानाचेही फार महत्व आहे. एकमेकांना तिळगुळ वाटतात. नात्यामध्ये पुन्हा नव्याने गोडवा निर्माण करण्याचा हा दिवस आहे.
या निमित्ताने आजूबाजूला फिरताना काळ्या रंगाची जादू, त्याचे सौंदर्यही अनुभवता येते. काळ्या सोनेरी झालर असलेल्या व स्टार असलेल्या आकर्षक अशा साड्या किंवा कपडे यासोबत घालण्यासाठी काळ्या रंगाचे दागिने मॅचिंग करून घेतले जातात. ते खुलूनही दिसतात. प्रत्येकाच्या मनात आनंद असतोच. हा आपला पारंपरिक सण आहे. आकाशात पतंग उडवून तरुणवर्ग आपला आनंद साजरा करतो. मकर संक्रातीपासून दिवस मोठा होत जातो तर या दिवसापासून दिवस हा तिळा-तिळाने मोठा होत जातो, असे म्हणतात. या दिवसापासून रात्रीच्या तुलनेत दिवस मोठा व्हायला सुरुवात होते.
विविध भागांत वेगवेगळ्या रीती-परंपरांनुसार साजरा केल्या जाणाऱ्या या सणाची नावेही वेगवेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुजरातमध्ये ‘उत्तरायण’, तमिळनाडूत ‘पोंगल’, पंजाब-हिमाचल प्रदेश या भागात ‘लोहरी’ अथवा ‘माघी’, आसाममध्ये ‘भोगली बिहू’, उत्तर प्रदेश-बिहार भागात ‘खिचडी, काश्मीरमध्ये ‘शिशुर सेंक्रात’, तर कर्नाटकमध्ये ‘मकर संक्रमणा’ अशा वैविध्यपूर्ण नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते. प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धती.
नाशिकजवळ ‘येवरा' येथे या दिवशी पतंगोत्सव साजरा केला जातो. गुजरातमध्ये आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. पतंग उडवण्यासाठी गुजरातमध्ये संक्रांतीच्या सणाची वाट पाहिली जाते. संक्रांतीसाठी विशेष हलक्या कागदाचे पतंग बनवले जातात. गुजरातमध्ये डिसेंबरपासून संक्रांतीपर्यंत ‘उत्तरायण’ साजरा केला जातो. हिवाळी भाज्यांचे प्रकार आणि तिळापासून बनवलेली गोड चिक्की हा या काळातील विशेष खाद्यप्रकार. बडोदा, अहमदाबाद, भावनगर यासारख्या मोठ्या शहरांत पूर्ण दोन दिवस पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो.
महाराष्ट्रात नवीन लग्न झालेल्या जोडप्याला तसेच नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण थाटात साजरा करण्याची परंपरा आहे. पूर्वी काटेरी हलव्याचे दागिने घरीच तयार केले जात होते. मात्र, आजच्या रेडिमेडच्या जमान्यातील बाजारात सहज उपलब्ध होत असतात.
उत्तर प्रदेशातही संक्रांतीचे विशेष महत्त्व. येथे मकर संक्रांत हा वर्षभरातील पवित्र स्नानांपैकी पहिल्या स्नानाचा दिवस मानला जातो. असंख्य लोक अलाहाबाद, वाराणसीसारख्या धार्मिक स्थळी एकत्र जमून पहाटे स्नान करून प्रार्थना करतात. दक्षिण भारतामध्ये तर हा सण उत्साहात साजरा केला जातो. तिथे पोंगल हा एक प्रकारचा गोड भात प्रकार केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी पोंगल नैवेद्य दाखवून पावसाची प्रार्थना केली जाते. हा सण तीन दिवस साजरा केला जातो.
‘लोहरी’ हा पंजाबमधील एक भव्य उत्सव, जो मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी शेकोटी करून त्याभोवती लोक एकत्र जमतात. या वेळी नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी एकत्र येतात. विविध प्रकारचे खाद्यप्रकार आणि नृत्य हे लोहरी सणाचे विशेष आकर्षण. ‘भांगडा’ हा नृत्यप्रकार सादर केला जातो. ‘सरसों का साग’ आणि ‘मकई की रोटी’ हा पंजाबमधील लोहरीचा विशेष मेनू असतो. संक्रांतीचा दिवस पंजाबमध्ये ‘माघी ’ म्हणून साजरा केला जातो. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे.
अलीकडेच साजरा झालेला हा मकर संक्रांतीचा पहिला सण सर्वांच्या आयुष्यात आनंदाचं लेणं घेऊनच येतो आणि मनाला तसेच विचारांना उभारी देऊन जातो. प्रत्येकाच्या मनामनात एक गोडवा निर्माण होत असतो. नवी नाती निर्माण होत असतात तर जुनी नाती अजून घट्ट होत असतात. या सणाच्या निमित्ताने आणि रथसप्तमीपर्यंत ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला' हे शब्द कानावर पडत असतात. मला वाटतं आपण हे शब्द मनात जपत, माणुसकी, नाती जपत आयुष्याची पायवाट चालू या.
(लेखिका साहित्यिक आहेत.)