तियात्र रंगभूमीवरील आई

कलाकार

Story: इजिदोर डांटस |
07th December 2019, 11:41 am
तियात्र रंगभूमीवरील आई


-
जेस्सी (कार्दोज) डायस या मूळ अंजुनाच्या. त्यांचा जन्म ३० मे १९४६ रोजी झाला. त्यांना तियात्र रंगभूमीवरील आई असे म्हटले जाते. त्यांनी तशा भूमिकाही केल्या आहेत. तसेच त्या प्रेमळ, परोपकारी असल्याने त्यांना हे नाव पडले आहे.
सी. आल्वारीस यांच्या ‘आतांच्यो सुनो’, रुझारियो यांच्या ‘म्हजें कितें करता?’, ए. एम. पाचेकोंच्या ‘फातर’ यात त्यांनी आईची भूमिका केल्या आहेत. ‘रोजार’, ‘सगळे रस्ते उक्ते’, प्रेमकुमार यांच्या ‘फुलां आनी कांटे’ रेमी कुलासोंच्या ‘घराचें सूख’ रोझफर्न्स यांच्या ‘सूख खंय आसा?’ यातही त्यांनी मुख्य भूमिका केल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांची ही पात्रे गाजलेली आहेत.
जेस्सी या गायनही करतात. सी. आल्वारीससोबत ‘सिनेमांक घेवन वचपाचे’, ‘दुदाचो डबो’, आल्फ्रेड रोझ यांच्या सोबत ‘दोतोर’ व ‘कित्याक म्हजें आयकोनाय?’ ही त्यांची द्वंद्वगीते गाजली आहेत. जेस्सी यांनी अनेक तऱ्हेच्या भूमिका केल्या आहेत. पण, दु:खी भूमिका करण्यामध्ये त्यांचा हातखंडा.
जेस्सी यांनी लाॅरेन्स दे तिराखोल यांच्या सोबत प्रथम गीतगायनाला सुरुवात केली. एक कलाकार गैरहजर राहिल्याने आल्फ्रेड रोझ यांच्या ‘डिरेक्टर सायब’ तियात्रात त्यांनी ऐनवेळी भूमिका केली.
फ्रान्सिस दे पर्रा, मेंडीस ब्रदर्ज, कीड बॉक्सर, रिको रोड, अॅन्थनी सॅन, प्रेमानंद सांगोडकर, मायक मेहता, जॉन क्लार, एम बॉयर, फेर्मिना खंवटे अशा अनेक दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखातील जेस्सी यांनी काम केले आहे.
जेस्सी यांनी अभिनय व गायनासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यात सिने टाईम्स, ग्रेट गोवन कोकाकोला, कलामोगी- कांदोळी, तियात्र अकादमी यांच्या पुरस्काराचा समावेश आहे. त्यांना गोवा सरकारचा राज्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे.
जेस्सी यांनी स्वत: काही तियात्र दिग्दर्शित केले आहेत. ‘सालाझार, चित्रां, कोणाक म्हणू मांय?’ हे ते तियात्र. ‘गिरेस्तकाय, मारियोला’ हे दोन कोकणी चित्रपट, ‘जबाबदारी, चिंत मनशा वगत आसतना, वादळ’ या टेलेफिल्ममध्ये त्यांनी काम केले आहे. काही सीडींमध्ये त्यांच्या गीतांचा समावेश आहे. त्यांना सलाम.
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)