परप्रांतीय आडनावे असलेले कर्मचारी गोमंतकीयच

‘कदंब’चे महाव्यवस्थापक संजय घाटे यांचे स्पष्टीकरण


14th November 2019, 03:11 am

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्य कदंब परिवहन महामंडळात अलीकडेच रुजू झालेल्या काही मोजक्याच कर्मचाऱ्यांची आडनावे परप्रांतीय आडनावांप्रमाणे भासत असली, तरी ते गोमंतकीयच आहेत आणि त्यांचा सर्वांचा जन्म गोव्यातच झालेला आहे. फक्त त्रयस्त व्यक्तीची माहिती कायद्यानुसान देता येत नसल्याने ती देण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण कदंब महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिले आहे.
‘कदंबच्या कारभाराचा पंचनामा’ अशी वृत्तमालिका दै. ‘गोवन वार्ता’मध्ये सध्या सुरू आहे. या वृत्तमालेत कदंब महामंडळाच्या व्यवस्थापनातील अनेक गैरकारभार आणि गैरव्यवस्थापनाचा पोलखोल करण्यात आला आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०१९ च्या या वृत्तमालिकेत ‘कदंब’मधील भरती संशयाच्या घेऱ्यात’ असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताला महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कदंब महामंडळाने कुठल्याही परप्रांतीयाला नोकरी दिलेली नाही. एखाद्याच्या आडनावावरून तो परप्रांतीय आहे, असे ठरविणे हे निव्वळ हास्यास्पद आहे, असेही घाटे यांनी म्हटले आहे. सर्व कामगारांना महामंडळाच्या भरती नियमानुसारच त्या त्या पदांवर निवडलेले आहे. माहिती हक्क कायद्यानुसार कुठल्याही त्रयस्थ माणसाची मागितलेली कागदपत्रे नाकारणे अनिवार्य अाहे आणि त्यामुळेच या कामगारांची माहिती अर्जदाराला नाकारली, असेही स्पष्टीकरण घाटे यांनी दिले आहे.
------------------------------------------

खुलाशात काय म्हटले आहे?
कदंब महामंडळात आपण सहाय्यक शाखा व्यवस्थापक म्हणून १९८३ साली रुजू झालो; पण आपल्याला बढती देण्यासाठी कुठलेही रोजगार नियम बदलण्यात आले नाहीत. कुठल्याही कामगाराची वैयक्तिक माहिती त्रयस्थ व्यक्तीला देणे नियमबाह्य आहे. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते यज्ञेश संझगिरी यांना ही माहिती देण्यात आली नाही, असे संजय घाटे यांनी या खुलाशात म्हटले आहे. सरकारी नियमानुसार १५ वर्षांचा रहिवासी दाखला हा रोजगारासाठी आवश्यक आहे. सर्व सरकारी व निमसरकारी खाती व कार्यालयांमध्ये हा नियम लागू आहे. संझगिरी यांनी नमूद केलेल्या आडनावांचे सर्व उमेदवार गोव्यात जन्मलेले आहेत, असेही घाटे यांनी स्पष्ट केले आहे.