हळदोणा वीज उपकेंद्राला आग; दीड लाखाचे साहित्य जळून खाक


14th November 2019, 06:09 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

म्हापसा :  गाळवार-हळदोणा येथील वीज उपकेंद्राच्या खोलीला मंगळवारी आग लागल्याने सुमारे दीड लाखाचे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा कयास अग्निशामक दलाने व्यक्त केला आहे.                   

हळदोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात दोन खोल्यांमध्ये वीज उपकेंद्र आहे. यांतील एका खोलीमध्ये बॉडबॅण्डसाठी वापरण्यात येणाऱ्या दहा बॅटरी, दोन संगणक, इंटरनेट केबल्स याशिवाय ३० ते ४० वीज जोडणीच्या फाईल्स होत्या. याच खोलीत मंगळवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास आगीचा भडका उडाला. त्यामुळे हे सर्व साहित्य जळून खाक झाले. या शिवाय बाजूच्या खोलीलाही काही प्रमाणात आगीची झळ पोहोचली.                  

दुर्घटनेच्या वेळी वीज कर्मचारी जवळच्या परिसरात वीज उपकरणांची दुरुस्ती करण्यासाठी गेले होते. त्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी शेजारील हळदोणा पोलिस आऊट पोस्टचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अग्निशामक दलाला पाचारण केले. दुसऱ्या बाजूने या कर्मचाऱ्यांनी खोलीच्या खिडक्यांवरील काचेची तावेदाने फोडून पाण्याद्वारे आग विजवण्याचा प्रयत्न केला. इतक्यात अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक परिश्रम घेऊन दुसऱ्या खोलीतील सामान वाचवले. या बचाव कार्यात म्हापसा अग्निशामन दलाचे हवालदार प्रमोद महाले, शैलेश माजिक, रिचर्ड त्रीनिदाद, सुनिल बाणावलीकर व दिलीप सावंत यांचा सहभाग होता. पोलिस हवालदार अजय गावकर यांनी घटनेचा पंचनामा केला. यात अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.

 दरम्यान, या दुर्घटनेत वीज केंद्रातील संगणक, बॅटरी, ब्रॉडबॅण्डचे केबल्स व इतर साहित्य मिळून सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती वीज खात्याचे सहाय्यक अभियंता रामदास सालेकर यांनी दिली आहे.