मडगाव नगराध्यक्ष पदासाठी फॉरवर्डकडून पूजा नाईक

विजय सरदेसाई यांची माहिती, बहुजन समाजाला प्रतिनिधित्वाची संधी


14th November 2019, 06:08 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

मडगाव : डॉ. बबिता प्रभुदेसाई यांनी मडगाव पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या पदासाठी गोवा फॉरवर्ड पक्षाच्या समर्थक नगरसेवक पूजा नाईक निवडणूक रिंगणात उतरणार आहेत, अशी माहिती पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी दिली.

आमदार सरदेसाई यांनी बुधवारी फातोर्डा येथील रस्त्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

जनमत कौलाचे जनक डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याच्या मुद्यावरून भाजप व काँग्रेस समर्थक नगरसेवकही एकत्र आले आहेत. या मुद्यावरून माघार न घेता नगराध्यक्ष प्रभुदेसाई यांनी राजीनामा दिला. मात्र, पुढील नगराध्यक्षही गोवा फॉरवर्डच्या गटातीलच असेल. नगरसेवक पूजा नाईक हा नवा चेहरा असून त्या बहुजन समाजातील महिला प्रतिनिधी आहेत. त्या नगराध्यक्ष झाल्यास बहुजन समाजाला मडगाव पालिकेचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. पूजा नाईक यांच्या विजयासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे आमदार सरदेसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.  

सिक्वेरा यांच्या पुतळ्याच्या विषयावरून वाद निर्माण झाल्याने भाजप व काँग्रेस समर्थक नगरसेवक एक झाले आहेत. त्यामुळे पालिकेवर वरचष्मा राहिलेल्या गोवा फॉरवर्ड समर्थक गटाकडे सध्या संख्याबळ कमी आहे. मात्र, प्रभुदेसाई यांनी राजीनामा दिल्यापासून गोवा फॉरवर्डकडून पूजा नाईक यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे विरोधक आता काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.