पोलिस हवालदारामुळे वाचले पर्यटकाचे प्राण

कांदोळी येथील समुद्रातील प्रकार


14th November 2019, 06:07 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

म्हापसा : कांदोळी समुद्रकिनारी दारूच्या नशेत समुद्राच्या पाण्यात उतरल्याने गटांगळ्या खाणाऱ्या सचिन राऊत (३०) या नागपूरच्या पर्यटकाला पोलिस हवालदार विनय च्यारी यांनी रशियन नागरिक व दोघा स्थानिकांच्या मदतीने वाचवले.

ही घटना बुधवारी सकाळी ९.४० वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिस हवालदार च्यारी समुद्रकिनारी गस्तीवर होते. यावेळी एक देशी पर्यटक समुद्राच्या पाण्यात गटांगळ्या खात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच हालचाली सुरू केल्या. त्याचवेळी एक रशियन पर्यटक व दोघा स्थानिकांनी पाण्यात उडी घेऊन त्यास सुखरूप बाहेर काढले. किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास कांदोळी सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे उपचार करून पर्यटकास घरी पाठविण्यात आले.            

  बुडणारा पर्यटक दारूच्या नशेत होता. त्यामुळे त्याचा पाण्यात तोल गेला. परंतु पोलिस हवालदार विनय च्यारी यांच्या दक्षतेमुळे तो वाचला. दरम्यान, मदत करणाऱ्या रशियन पर्यटक व त्या दोघा स्थानिकांचे पोलिसांनी आभार मानले आहेत.