जीवरक्षकांच्या संपामुळे पर्यटक अडचणीत

कायम स्वरूपी तोडगा काढण्याची गरज : मंत्री मायकल लोबो


14th November 2019, 06:05 pm

प्रतिनिधी । गोवन वार्ता            

म्हापसा : समुद्रकिनारी जीवरक्षक ही अत्यावश्यक सेवा आहे. ही सेवा देणारेच संपावर गेल्यामुळे पर्यटक आणि स्थानिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. पर्यटक बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  हल्लीच्या काळात उत्तर गोव्यात विदेशी पर्यटकांसह १४ जणांचा बुडून मृत्यू झाला. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याच्या बाबतीत चुकीचा संदेश जात आहे. 

त्यामुळे जीवरक्षकांच्या समस्यांवर कायम स्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे, असे मत ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले.

कळंगुट येथे बुधवारी एका कार्यक्रमस्थळी मंत्री लोबो पत्रकारांशी बोलत होते. दृष्टी मरीन संस्थेचे जीवरक्षक दरवर्षी संपावर जातात. गेल्या सात वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. हे जीवरक्षक संपावर गेल्यानंतर दृष्टी कंपनीकडून तात्पुरते परप्रांतीय जीवरक्षक नियुक्त केले जातात. पण त्यांना गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची सखोल माहिती नसते. त्यामुळे दुर्घटना रोखण्यात अडचणी निर्माण होत आहेत, असे मंत्री लोबो यावेळी म्हणाले.

जीवरक्षकांचा संप चालूच राहिल्यास त्याचा परिणाम राज्याच्या पर्यटनावर होईल. पर्यटन हंगाम सुरू झाला आहे. मोठ्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक गोव्यात दाखल होत आहेत. त्यात रशियन पर्यटकांची मोठी संख्या आहे. या पर्यटकांना गोव्यातील समुद्र किनाऱ्यांचा अंदाज नाही. अशा स्थितीत स्थानिक जीवरक्षक समुद्रकिनारी तैनात असणे गरजेचे आहे. संपावर गेलेल्या जीवरक्षकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत. त्यांच्या मतानुसार त्यांचा छळ सुरू आहे. सरकारने महामंडळ किंवा सोसायटीअंतर्गत  त्यांना सेवेत सामावून घ्यावे, अशी त्यांची मागणी आहे, अशी माहिती लोबो यांनी यावेळी दिली.

मंत्री लोबो म्हणाले...

- दृष्टीने संपावर गेलेल्या जीवरक्षकांच्या जागी पुण्यातील जीवरक्षकांची पर्यायी नियुक्ती केली आहे. त्याचा कोणताच फायदा दिसून येत नाही.

- जीवरक्षकांच्या समस्यांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. पर्यटनमंत्र्यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

- जीवरक्षकांची समस्या एकत्र बसून सोडविण्याची गरज आहे. जीवरक्षकांचा हा प्रश्न महिनाभरासाठी नव्हे तर कायमस्वरूपी सोडवायला हवा.

.....
किनाऱ्यावरील स्वच्छतेचे कंत्राट कर्नाटकातील कंपनीला देण्यात आले आहे. त्यांच्याकडून सफाईचे चोख काम होत आहे. कंत्राटदाराने नव्या साधन सुविधांवर भर दिला आहे. बागा ते सिकेरीपर्यंतचा किनाऱ्यावरील कचरा उचलण्यासाठी दोन ऐवजी सात वाहने तैनात ठेवली आहेत, अशी माहिती मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे.